‘रिओ’स्टार खेलरत्न!
By admin | Published: August 23, 2016 06:39 AM2016-08-23T06:39:03+5:302016-08-23T06:39:03+5:30
दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांना यंदाचा राजीव गांधी ‘खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, महिला कुस्तीतील कांस्य विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकच्या व्हॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिलेली दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय यांना यंदाचा राजीव गांधी ‘खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. चार खेळाडूंना एकाचवेळी हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार निवड समितीने दीपा आणि जितू यांच्या नावाची खेलरत्नसाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. क्रीडा मंत्रालयाने सोमवारी चार खेळाडूंना हा सन्मान देण्यात येत असल्याची घोषणा केली. खेलरत्न तसेच अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय क्रीडादिनी २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येतील. (वृत्तसंस्था)
>असे आहेत क्रीडा पुरस्काराचे आणखी मानकरी
दीपाचे कोच बिश्वेश्वर नंदी आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कोच राजकुमार शर्मा यांना यंदा द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ललिता बाबर, अजिंक्य रहाणे, हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथ आणि राणी रामपाल, बधिर मल्ल वीरेंद्रसिंग, महिला मल्ल विनेश फोगाट यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.प्रोत्साहनपर पुरस्कार सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीला दिला जाईल. द्रोणाचार्यमध्ये चार नियमित आणि दोन जीवनगौरव पुरस्कार आहेत. कुस्ती कोच महावीरसिंग यांना जीवन गौरवने सन्मानित केले जाईल.
>रिओ आॅलिम्पिकमध्ये
सहभागी झालेल्या 118सदस्यांच्या भारतीय पथकातील चौघांना खेलरत्न तसेच आठ जणांना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.
2009मध्ये मल्ल सुशील कुमार, बॉक्सर विजेंदरसिंग आणि एम. सी. मेरिकोम या तिघांना संयुक्तपणे खेलरत्न दिला होता.