'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 05:51 PM2024-10-27T17:51:30+5:302024-10-27T17:51:30+5:30
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
S. Jaishankar on Mumbai 26/11 Attack : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भविष्यात असा हल्ला झाला, तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल', असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मुंबईत रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, 'जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो, तेव्हा चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा अर्थ होतो. मुंबई हे केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दहशतवादविरोधी प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य असताना भारताने दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच, ज्या हॉटेलमध्ये हल्ला झाला होता, तिथेच समितीची बैठक झाली होती.'
Speaking to the press in Mumbai.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 27, 2024
https://t.co/EdjztJFcXx
परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, 'भारत जगातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. दिवसा एक काम अन् रात्री दहशतवादी कारवाया, असे आता चालणार नाही. भारत आणि चीन लवकरच लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त सुरू करतील. सीमेवरील परिस्थिती एप्रिल 2020 पूर्वीसारख होईल', अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई 26/11 हल्ला
26 नोव्हेंबर 2008 साली भारताची आर्थित राजधानी मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाचे दहा दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत घुसले आणि मुंबईतील ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी अंदाधूंद गोळीबार केला होता. त्या घटनेत 20 जवान आणि 26 परदेशी नागरिकांसह किमान 174 भारतीयांचा मृत्यू झाला होता. तसेच, 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.