मानेवड्यातील एस. के. बारमध्ये पोलिसांचा छापा
By admin | Published: July 16, 2017 10:00 AM2017-07-16T10:00:04+5:302017-07-16T10:00:04+5:30
बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या पुनह एका बियर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा घातला.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या पुनह एका बियर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा घातला. सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी स्वत:च मानेवाड्यातील या बारमध्ये छापा घालून कारवाई केली. त्यामुळे मालकासह मद्यपींच्याही तोंडचे पाणी पळाले.
मानेवाडा रिंग रोड चौकात एस.के. बियर बार आहे. विलास मानिकराव करांगळे हे या बारचे मालक असून ते भाजपा दक्षीण नागपूरचे महामंत्री आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महामार्गापासून ५०० मिटर आत असलेल्या बियर बारमध्ये मद्य विक्रीला प्रतिबंध करण्यात आला. त्यानुसार उपराजधानीतील महामार्गालतच्या अनेक बियर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील लावले. असे असतानाही उपराजधानीतील अनेक बारमध्ये बिनबोभाट ग्राहकांना मद्य विकले जात आहे. मानेवाड्यातील एस. के. बारमध्ये अशाच प्रकारे ग्राहकांना मद्य विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवस शहानिशा केल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी वाघचौरे यांनी आपल्या पथकासह शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास या बारमध्ये छापा घातला. यावेळी तेथे रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. हा बार भाजपा पदाधिका-याचा असल्याची कल्पना असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण कारवाईचा व्हीडिओ तयार केला आहे. या कारवाईमुळे बार मालकासोबतच मद्यपींचेही धाबे दणाणले. करांगळेंच्या बारवर धाड पडल्याचे वृत्त पसरताच रिंग रोडवरील बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली.
बारमालकाने फोडले सील
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिबंधानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारमध्ये ठेवलेली दारू एका खोलीत ठेवून त्या खोलीला सील केले होते. बारमालकाने त्या सीलमधून एक असे छिद्र केले की ते चावी लावून कुलूप उघडता येत होते. या रूममध्ये नियमित मद्य ठेवून आणि तेथील मद्य काढून ते ग्राहकांना विकले जात होते. हा प्रकार पाहून पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना माहिती देऊन कारवाईच्या ठिकाणी बोलवून घेतले. दरम्यान, या बारमध्ये वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती. त्यामुळे तेथे नेमका कोणता अन् किती रुपयांचा मद्यसाठा मिळाला, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, येथे असलेला मद्यसाठा आणि साहित्याची किंमत लाखो रुपयांत जाईल, अशी माहिती एसीपी वाघचौरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महिनाभरात चवथी कारवाई
बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या बारमध्ये पोलिसांनी छापा घालण्याची महिनाभरातील ही चवथी कारवाई आहे. यापूर्वी धंतोलीतील निडोज बारमध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालण्यात आला होता. नंतर पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सदरमधील हेरिटेज बारमध्ये छापा घातला. त्यानंतर पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांनी कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये छापा घालून कारवाई केली. या तीन ह्यबंद बियर बारह्णमध्ये छापा घालून पोलिसांनी मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. आता एस. के. बारमध्ये छापा घालून पोलिसांनी खळबळ उडवून दिली आहे.