‘त्या’ चिमुकल्याच्या ताब्याचा पेच कायम
By admin | Published: January 18, 2016 03:48 AM2016-01-18T03:48:39+5:302016-01-18T03:48:39+5:30
नेपाळमध्ये पतीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाचा ताबा मिळावा, म्हणून एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली
नागपूर : नेपाळमध्ये पतीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाचा ताबा मिळावा, म्हणून एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ८ डिसेंबर रोजी न्यायालयाने या चिमुकल्याला ११ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु तो नेपाळमध्ये असल्यामुळे पोलिसांना आदेशाचे पालन करता आले नसल्याने त्याच्या ताब्याचा पेच अद्यापही कायम आहे.
न्यायालयाने आता ८ डिसेंबरचा आदेश नेपाळ दूतावासाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच मुलाच्या आईलाही तिच्या परीने प्रयत्न करण्याची मुभा दिली आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दीपाली ठाकूर असे याचिकाकर्तीचे नाव असून, ती अमरावती येथील रहिवासी आहेत. तिने नेपाळचा मूळ रहिवासी बहादूरसिंग ठाकूरशी २५ मे २००९ रोजी लग्न केले. त्यांना वंश नामक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले. दीपाली आजारी वडिलांना पहायला अमरावती येथे आली असता, बहादूरसिंग मुलाला घेऊन नेपाळला निघून गेला.
मुलाचा ताबा आईला देण्यासंदर्भात सीबीआयने न्यायालयाच्या निर्देशानुसार नेपाळ दूतावासाशी पत्रव्यवहार केला आहे. (प्रतिनिधी)