‘सा. रें.’च्या जाण्याने चळवळीचा मार्गदर्शक हरपला
By admin | Published: April 1, 2015 11:11 PM2015-04-01T23:11:05+5:302015-04-02T00:36:59+5:30
कार्यकर्त्यांची भावना : सांगलीशी जुळले होते ऋणानुबंध, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झाले सुन्न
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याचे संस्थापक आणि काँग्रेसचे आमदार आणि विचारांनी ‘तरुण’ असलेले सा. रे. ऊर्फ आप्पासाहेब पाटील पुरोगामी विचारांशी इतके समरस झाले होते की, त्यांना पक्षाचे बंधन आड आले नाही. आज (बुधवारी) सकाळी ‘सा. रे.’ यांचे निधन झाल्याचे वृत्त आले आणि सांगलीमधील चळवळीतील कार्यकर्ते अक्षरश: सुन्न झाले. शांतिनिकेतनशी त्यांचे स्नेहबंध जुळले असल्याने तेथेही शांतता होती. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आणि सा. रे. पाटील यांचा ऋणानुबंध अतिशय दृढ होता. शांतिनिकेतनच्या नवभारत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कित्येक वर्षापासून जबाबदारी सांभाळत होते. वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी वयाची पर्वा न करता ते शांतिनिकेतनमधील बैठकीस हजर असत. शांतिनिकेतनमध्ये कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तर ‘सा. रें.’ची उपस्थिती हमखास असायचीच. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह. शांतिनिकेतनमध्ये कोणताही नवीन उपक्रम राबवायचा म्हटले की, पहिला निरोप हा ‘सा. रें.’ना असायचा. तेथे १६ जानेवारी २०१५ रोजी पंचायतराज स्मृती उद्यानाच्या उद्घाटन समारंभास ते ९४ व्या वर्षीही हजर होते. आज सकाळी सा. रे. पाटील यांचे निधन झाल्याचे कळताच शांतिनिकेतनमधील प्रत्येक कर्मचारी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा दिसत होती. शांतिनिकेतनचा आधार असलेल्या सरोजमाई, त्यानंतर पी. बी. सर, नंतर आर. आर. पाटील आबा आणि आता सा. रे. पाटील गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने १९९३ मध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांचे मुखपत्र म्हणून ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र’ काढण्याचे निश्चित झाले. परंतु नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांपुढे पैशाची अडचण उभी राहिली. त्यावेळी सर्वजण सा. रे. पाटील यांच्याकडे गेले होते. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना देताच, समाजातील अंधश्रध्दा दूर होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची कृतिशील ग्वाही त्यांनी दिली होती. ‘अंनिस’तर्फे शहरात आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ या शिबिराच्या उद्घाटनास ते आवर्जून आले होते. अंनिसतर्फे, दत्त कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या खंजीरे मळा येथील मांत्रिकाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी स्थानिक राजकारणामुळे बाका प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते, अशी आठवण अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितली. (प्रतिनिधी) नवभारत शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांसमवेत माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. अनेक विकास कामात तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असे. - गौतम पाटील, संचालक, नवभारत शिक्षण मंडळ, आठवणींमधून उतरले सा. रे. महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांनी एकत्र यावे म्हणून सांगली येथे चित्रपट अभिनेते नंदू माधव यांच्या संकल्पनेतून ‘सांगड’ या उपक्रमाचे २०१३ मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याची आठवण अॅड. अमित शिंदे यांनी सांगितली. पत्रकार दीनानाथ भोसले हे त्यावेळी सांगलीत दोन दैनिके चालवत होते. ते समाजवादी विचाराचे असल्याने त्यांचे व सा. रे. पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध होते. याच मित्रत्वातून सांगलीत विविध राजकीय विचारांच्या लोकांचा एक गट निर्माण झाला. अण्णासाहेब कराळे यांच्या कट्ट्यावर त्यांचा गप्पांचा फड रंगत असे. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने सांगलीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचे नियोजन नुकतेच केले होते. ही कल्पना सा. रे. पाटील यांना समजताच त्यांनी स्वत:हून कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. मिरज येथील आय. एम. ए. सभागृहात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव सा. रे. पाटील यांच्याहस्ते फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी, धावपळीच्या युगात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्थान नसल्याची खंत व्यक्त केली होती, असे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते सदाशिव मगदूम यांनी यावेळी सांगितले. सा. रे. पाटील हे काँग्रेसचे आमदार असले तरीही, समाजवादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. रयत शिक्षण संस्थेशी देखील त्यांचा ऋणानुबंध होता. वेळोवेळी त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे रयत शिक्षण संस्था समितीचे प्रतिनिधी अॅड. अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.