ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 07:25 AM2022-07-28T07:25:11+5:302022-07-28T07:25:50+5:30
फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन भाग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनी त्यांनी उत्तरं दिली होती. दरम्यान या मुलाखतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मॅच फिक्सिंग असा उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत, असे म्हणत शिवसेनेने टोला लगावला.
ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. तो अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा आहे. त्यामुळे ठसका लागणारच! विरोधकांचे तसेच झाले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हटलेय अग्रलेखात?
फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे?, असा सवालही शिवसेनेने केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘आपण उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचली नाही, पाहिली नाही. ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे.’ यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जर त्यांनी ती वाचली नसेल म्हणजे ते राजकीय पुरुष नाहीत. कारण उद्धव ठाकरे हे काय बोलतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. फडणवीस यांची मानसिक स्थिती समजून घेतली तर त्यांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शिवसेनेने नमूद केले आहे.
असे प्रश्न तरी दिसत नाही
अक्षय कुमार मोदींना विचारतात, ‘‘आदरणीय पंतप्रधानजी, आपण आंबे कापून खाता की चोखून खाता?’’ असे प्रश्न तरी ठाकरे-राऊत मुलाखतीत दिसत नाहीत. ठाकरे यांची मुलाखत चोखून खाण्याची चीज नाहीच. पंतप्रधानांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे असे आम्ही म्हणणार नाही, असेही शिवसेनेने म्हटलेय.
मंत्रिमंडळाचा अतापता एक महिन्यानंतरही नाही. इतके फिक्सिंग करून सरकार जन्माला घातले, पण ते रडत नाही की हात-पाय हलवत नाही, हा चिंतेचा विषय आहे. सरकारचा जन्म अनैसर्गिक परिस्थितीत झाला की दुसरे काय व्हायचे?, असा सवालही त्यांनी केला.