'सामना'नं हकालपट्टी केली अन् पक्षप्रमुख म्हणतात, चूक झाली; आढळराव पाटील दुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:24 AM2022-07-04T07:24:43+5:302022-07-04T07:25:27+5:30
शिवसेनेतून हकालपट्टी; मग कारवाई मागे घेतली, आढळराव पाटील म्हणतात, सावरायला वेळ लागेल
मंचर (जि. पुणे) : मी शिवसेनेतच आहे, पण मी खूप दु:खी झालो आहे. पक्षाने असे करायला नको होते. अनावधानाने झाले की कसे हे मला माहिती नाही; पण, अठरा वर्ष या जिल्ह्यात एक हाती पक्ष टिकवून ठेवलाय. प्रामाणिक एकनिष्ठ राहून पक्षाने असे करणे मला आवडलं नाही. पक्षाने कारवाई मागे घेतली असली तरी यातून सावरायला मला काही दिवस जातील, अशी भूमिका शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांडली.
शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याच्या बातम्या सकाळी पसरल्या. काही तासातच शिवसेना पक्षाने आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई मागे घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. ते पक्षाचे उपनेते आहेत व पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
रात्री साडेदहा वाजता उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. मतदार संघातील काही पदाधिकारी आपल्याला भेटायला येणार आहेत. रविवारी माझा जनता दरबार असल्याने मी मंगळवारी आपल्याला भेटायला येतो असे बोलणे झाले. रविवारी सकाळी पेपर पाहिल्यावर मला माझी हकालपट्टी झाल्याचे समजले. वाईट वाटले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. ही अनावधानाने चूक झाल्याचे ते म्हणाले. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मुंबईला या आपण बोलू. मला खूप वाईट वाटलंय. यातून सावरायला दोन ते तीन दिवस जातील, नंतर ठाकरेंना भेटेल.
... हीच माझी चूक
माझी चूक एकच झाली. मी एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाची पोस्ट टाकली. पोस्ट टाकून चुकीचे काही केले असे मला वाटत नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी एकटा संघर्ष करतोय, त्याचेच फळ भोगतोय असं वाटतंय.