"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:49 AM2021-10-08T07:49:20+5:302021-10-08T07:49:44+5:30
शिवसेनेचा सवाल. जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, शिवसेनेचं वक्तव्य
जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा शाधला.
महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?, असा सवालही शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत.
... ते सरशीवाल्यांनी सांगावं
ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे.
जिल्हा परिषद निवडणुकांतही महाविकास आघाडीस 46 तर भाजपला 22 जागा मिळाल्या. आता 46 हा आकडा भाजपच्या 22 पेक्षा दुप्पट असे कोणताही ‘गणिती’ सांगेल. इतिहासाचे धडे बदलले जात आहेत तसे बीजगणित, भूमितीची प्रमेयेसुद्धा बदलली जात आहेत काय? या काही सरसकट निवडणुका नव्हत्या हे समजून घेतले पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांना सामोरे जावे लागले.
मजबूत विरोधीपक्ष म्हणून ताकद दाखवली
भारतीय जनता पक्षाचे म्हणणे असे की, त्यांचा पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. ते खरेच आहे. भाजपने 22 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला संकोच वाटू नये. महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. भाजपने 22 जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे 105 आमदार निवडून आले, पण 105 आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही.
देशातले वातावरण भाजपविरोधी
देशातले वातावरण भाजपविरोधी झाले आहे. उत्तर प्रदेशातील मंत्रीपुत्राने ज्या निर्घृणपणे शेतकऱयांना चिरडून मारले, त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. महाराष्ट्रातला शेतकरीही चिंतेत आहे. निसर्गाचा तडाखा आहेच, पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारनेही हात आखडता घेतल्याने शेतकऱयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या सगळय़ांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करीत आहे. भाजपची धोरणे सरळ सरळ शेतकरीविरोधी आहेत. भाजप शेतकऱयांशी सूडाने वागत आहे. हा सूड शेतकऱयांचे मुडदे पाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला हे काही माणुसकीचे लक्षण नाही.