सास:याने केले सुनेचे कन्यादान
By admin | Published: July 23, 2014 03:07 AM2014-07-23T03:07:29+5:302014-07-23T03:07:29+5:30
पुत्रवियोगाचं आभाळाएवढं दु:ख उराशी लपवून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला साजेसा निर्णय खेडय़ातील एका गृहस्थाने घेतला.
Next
विनोद कापसे - मांगलादेवी (यवतमाळ)
एकुलता एक वंशाचा दिवा एका वळणावर अचानक विझला. सुनेचे आयुष्य अंधकारमय झाले. मात्र पुत्रवियोगाचं आभाळाएवढं दु:ख उराशी लपवून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला साजेसा निर्णय खेडय़ातील एका गृहस्थाने घेतला. विधवा सुनेलाच स्वत:ची लेक समजून तिचा थाटात पुनर्विवाह लावून दिला. 14 महिन्यांपूर्वी सासरा असलेला तो गृहस्थ तिचा बाप झाला. कन्यादान करीत सुनेच्या अंधकारमय आयुष्यात त्याने प्रकाशाची पेरणी केली. नेर तालुक्यातील चिखली कान्होबा येथील प्रकाश घावडे यांच्या या निर्णयाने समाजासमोर एक नवीन प्रकाशवाट निर्माण केली.
प्रकाश व चंद्रकला घावडे यांना राजेंद्र नावाचा एकुलता एक मुलगा होता. 14 महिन्यांपूर्वी त्यांनी प्रकाशचा थाटात विवाह लावून दिला.
सारे घर आनंदात न्हावून निघाले होते. मात्र या सुखी संसाराला नियतीची दृष्ट लागली. राजेंद्रचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सून मालाचा संसार उघडय़ावर पडला. लाडक्या सुनेच्या आयुष्याचे काय? ही चिंता प्रकाश घावडे यांना सतावू लागली.
नावाप्रमाणोच प्रकाशवाटेने जीवन जगणा:या प्रकाश घावडे यांना कुठल्याही स्थितीत सुनेच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करायचीच हा ध्यास स्वस्थ बसू देत नव्हता. काळजावर दगड ठेवत त्यांनी वरसंशोधन सुरू केले. पत्नी चंद्रकला यांनीही या कठीण समयी त्यांच्या निर्धाराला हत्तीचे बळ दिले. चांदूर रेल्वे येथील अमोल दत्तूजी बानाईत हा पदवीधर तरुण मालाशी लग्न करायला तयार झाला आणि 2क् जुलै रोजी येथील मंगलादेवी संस्थानमध्ये शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मालाने अमोलच्या गळ्यात वरमाला घातली. तेव्हा प्रकाश अन् चंद्रकलाच्या डोळ्यांत मात्र आसवांचा महापूर दाटला होता.
पुत्रवियोगाचे दु:ख आणि सुनेला दिलेले नवजीवन या सुखदु:खाच्या संमिश्र भावनांनी प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते.
तीन एकर शेती सुनेच्या नावे
मुलाच्या मृत्यूनंतर सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून प्रकाश घावडे यांनी काही दिवसांपूर्वीच तीन एकर शेती मालाच्या नावाने करून दिली. मालाला वडील नाहीत. प्रकाश घावडे यांनी लग्नपत्रिकेतही मालाच्या नावासमोर स्वत:चे नाव लावून तिला वडील नसल्याचे दु:ख जाणवू दिले नाही. आयुष्यभर तिला चोळी-बांगडी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.