‘साहब खाने को वडापाव भी चलेगा’...

By admin | Published: July 2, 2016 05:18 AM2016-07-02T05:18:37+5:302016-07-02T05:18:37+5:30

गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत दोन गुन्ह्यांत कबुली दिली आहे.

'Sab ki dining to wadapaav will run' ... | ‘साहब खाने को वडापाव भी चलेगा’...

‘साहब खाने को वडापाव भी चलेगा’...

Next

मनीषा म्हात्रे,

मुंबई- गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत दोन गुन्ह्यांत कबुली दिली आहे. मात्र अन्य गुन्ह्यांत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेत हात वर केल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकेकाळी पूर्व उपनगरात दहशत निर्माण केलेल्या गँगस्टरने पोलिसांसमोर पडती बाजू घेतली आहे. अशावेळी ‘साहेब.. खायला वडापाव दिला तरी चालेल, फक्त पोटापाण्याचे बघा,’ असे तो तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे.
सिंगापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर गुन्हे शाखा ७चे अधिकारी पिल्लेकडे अधिक तपास करीत आहेत. हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे एकूण ९ गुन्हे कुमार पिल्लेविरोधात दाखल आहेत. यापैकी २००९मध्ये त्याने खंडणीसाठी विकासकावर हल्ला केला होता, त्यानंतर लोढा विकासकाच्या कार्यालयात गोळीबार केला होता. या दोन गुन्ह्यांसह २०१३मध्ये मनसे आमदार मंगेश सांगळे यांना खंडणीसाठी धमकाविणे अशा तीन गुन्ह्यांचा सखोल तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
यापैकी दोन गुन्ह्यांची कबुली कुमार पिल्लेने पोलिसांना दिली. त्यात विक्रोळीतील शहा विकासकावर झालेल्या गोळीबाराचाही समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. पिल्लेने २००९ साली विक्रोळी येथील रमेश शहा विकासकाला फोन करून ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकाविले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर यातील तिघांना मोक्का न्यायालयाने दोषी ठरविले होते. मात्र पोलिसांपुढे नरमाईची भूमिका घेतलेल्या पिल्लेने इतर गुन्ह्यांत हात वर केले आहेत. अन्य गुन्ह्यांत आपला काहीही संबंध नसून आपल्या नावाने पैसे उकळण्यात येत होते. याबाबत मी माझ्या टोळीतील मुलांना तक्रार देण्यासही सांगितले होते, अशी माहिती पिल्लेने पोलिसांना दिली. मात्र गुन्ह्यांतून पळ काढण्यासाठी पिल्ले मार्ग काढत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार गुन्हे शाखा त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहे.
>दाऊदचा गेम करण्याचा होता कट
पिल्लेने अमर नाईकसह मिळून दाऊदचा गेम करण्याचा कट आखल्याची माहिती समोर आली. ४ शुटर पिल्लेने आखलेल्या कटानुसार दुबईत पोहचले होते. दाऊद शारजा स्टेडीयमवर जाणार असल्याची माहिती शुटर्सकडे आली होती. त्याला मारायचे कुठे यावरुन या चौघांमध्येच वाद सुरु झाला. यातून दाऊद त्यांच्या हातातून निसटला.

Web Title: 'Sab ki dining to wadapaav will run' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.