सबनीस, जाखडे यांचे अर्ज दाखल
By admin | Published: September 1, 2015 01:20 AM2015-09-01T01:20:32+5:302015-09-01T01:20:32+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले.
ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत. जाखडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्रीधर माडगूळकर यांची स्वाक्षरी असून, डॉ. सबनीस यांच्या अर्जावर के.रं. शिरवाडकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. कोल्हापुरातील दक्षिण साहित्य संघाचे चंद्रकुमार नलगे मंगळवारी पुण्यात अर्ज भरण्याची शक्यता आहे.
चांगल्या लेखकाला चांगला प्रकाशक मिळत नाही, चांगल्या प्रकाशकाला चांगला लेखक मिळत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. वाङ्मयीन क्षेत्रात चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असल्याचे अरुण जाखडे यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
साहित्य प्रांतातील हा नवा प्रयोग नेटाने स्वीकारला आहे. कलाविष्कारात सर्व घटकांना सन्मानित करण्यात आले आहे, पण यापूर्वी एकाही प्रकाशकाला अध्यक्षपदासाठी संधी मिळालेली नाही. घुमान साहित्य संमेलनादरम्यान साहित्य परिषद आणि प्रकाशक यांच्यात वैचारिक मतभेद होते. तात्त्विक वाद सोडविण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.
राजकारणी व्यक्तींच्या शब्दावर विश्वास ठेवावा की नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. दुभंगलेला महाराष्ट्र, अस्वस्थ तरुणाई याचा विचार फक्त साहित्यिकच करू शकतो, याचसाठी संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असल्याचे प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.