सबनीसांचा दिलगिरीनामा

By Admin | Published: January 13, 2016 04:16 AM2016-01-13T04:16:50+5:302016-01-13T04:16:50+5:30

पिंपरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी

Sabnis's Declaration | सबनीसांचा दिलगिरीनामा

सबनीसांचा दिलगिरीनामा

googlenewsNext

- पंतप्रधानांना पाठविले पत्र

पुणे : पिंपरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावर आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
साहित्य संमेलन ३ दिवसांवर येऊनही वाद शमत नसल्याने पाटील यांनी मंगळवारी दुपारी सबनीस यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सुमारे १२ ते १३ मिनिटांमध्ये सबनीस यांनी त्यांचे निवेदन आणि पंतप्रधानांना पाठविलेले पत्र वाचून दाखविले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि महेश थोरवे-पाटील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, माझ्यामुळे संमेलनाला गालबोट लागू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाने अनेकांची मने दुखावली. मोदींच्या राष्ट्रभक्तीचा आपण वेळोवेळी गौरवही केला आहे. पण, त्यांचा एकेरी उल्लेख झाल्याने मी त्यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे. झाले गेले गंगेला मिळाले. मराठी भाषा, संस्कृतीवर प्रेम असणाऱ्यांना संमेलनासाठी हार्दिक निमंत्रण देतो. मराठीच्या भवितव्यासाठी संमेलन यशस्वी होणे, त्यासाठी योगदान देणे हे आपले अध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे. मोदींसंदर्भात आतापर्यंत आपण गौरवपर लिखाण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ जानेवारीलाच पत्र पाठवून ‘मन की बात’ विषद केली आहे. त्याच्या प्रति महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही पाठविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

‘मन की बात’
गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांचे विचार आपण जगाच्या काना-कोपऱ्यांत पोहोचवत आहात. जिवाची पर्वा न करता पाकिस्तानात शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही गेलात. हे केले ते राष्ट्रहितासाठीच. पुण्यातील एका भाषणात आपला एकेरी उल्लेख झाला. ग्रामीण भागातून आलो असल्याने आपला एकेरी उल्लेख झाला. त्यातून गैरसमज निर्माण झाले. त्यातून मला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. येथील वातावरण बिघडले आहे. आपला एकेरी उल्लेख होणे ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आप मेरी ‘मन की बात’ समझ पाऐंगे, असे श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Sabnis's Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.