वसई-विरार पालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार; शिवसेनेने आखली रणनीति!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:33 AM2022-05-26T11:33:37+5:302022-05-26T11:35:09+5:30
संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे शिवसेना नेत्याने स्पष्ट केले आहे.
वसई: मुंबई, ठाणेसह राज्यभरातील अनेकविध महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. यात वसई-विरार पालिकेचाही समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी बहुतांश सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आग्रही असून, त्यादृष्टीने रणनीति आखायला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेना युवानेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि नेते सचिन अहिर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सचिन अहिर यांनी वसईतील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आगामी वसई-विरार पालिका निवडणुकांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंच्या भूमिकेबाबत बोलताना, राज्यसभा निवडणुकांबाबत आम्ही शेवटपर्यंत नाव जाहीर केले नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आदर राहील. त्यांनी स्वतःची राजकीय भूमिका जाहिर केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून नाव जाहीर झाल्यानंतर आता चर्चा नको. संभाजीराजेंचा विषय आता आला. मात्र, सहावा उमेदवार आमचा पहिल्यापासून ठरला होता, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील
वसई विरारमध्ये बदल घडवायचा असेल, तर महाविकास आघाडीने एकत्र येणे गरजेच आहे. कार्यकर्त्यांनी परिवरर्तनाची जिद्द बाळगली पाहिजे. वसई विरारमधील निवडणुकात आदित्य ठाकरेंचा चेहरा असणार आहे. कारण वसई विरारमध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. येथील जनतेला विकास पाहिजे आहे. येथील जनता जात धर्माच्या राजकारणात अडकत नाहीत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील पालिका निवडणुका लढवल्या जातील, असे सचिन अहिर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, मनसेने घेतलेल्या भोंग्यांसंदर्भात बोलताना, राज ठाकरेंचा भोंगा आता बंद झाला आहे. भोंग्याची वायर, एम्पिलिफायर हे कुणाच होते. हे आता सर्वांना माहिती पडले आहे. ज्यांच्या भोंगा वाजवत होते, त्यांनीच आता त्यांच्यावर ट्रॅप करणार असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरेंना आता दुर्दैवानं प्रत्येक भूमिकेतून माघार घ्यावी लागत आहे, असे ते म्हणाले.