सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:12 PM2018-08-30T14:12:03+5:302018-08-30T14:31:52+5:30
पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाचा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांकडे एकाच वेळी तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी मान्य करत न्यायालयाने त्याला 1 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. एस सय्यद यांनी हा आदेश दिला.
पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कळसकर याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. कळसकर आणि अंदुरे याचा एकत्रित तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील जयकुमार ढाकणे यांनी केली.
बचाव पक्षाच्या वतीने धरमराज यांनी युक्तिवाद केला, चार दिवसाच्या कोठडीत कोणताही तपास झालेला नाही. कळसकर याला 3 सप्टेंबर पर्यंत एटीएसची कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे अंदुरे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास बरोबर तपास करण्याचा उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे पोलीस कोठडी ऐवजी अंदुरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी विनंती adv धरमराज यांनी केली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने अंदुरे याला एक तारखेपर्यंत कोठडी सुनावली.
आधी युक्तिवाद मग वकीलपत्र
या प्रकरणात या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये बचाव पक्षाच्या वतीने adv प्रशांत कर साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला मात्र काही कारणास्तव ते आज न्यायालयात येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या ऐवजी ऍड धरमराज यांनी बचाव पक्षाची भूमिका मांडली. वकील बदली झाल्यानंतर युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने पक्षकाराचे वकीलपत्र घेणे अपेक्षित आहे मात्र धरम राज ज्यांनी वकील पत्र न घेताच युक्तिवाद केला ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर धरमराज यांनी अंदुरे याच्या वकीत्रापत्रावर सह्या घेतल्या.
तिघांना गुरुवारी हजर करणार
गौरी लंकेश प्रकरणात अटक केलेल्या तिघांचा दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीबीआय अटक करून त्यांना शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार आहे. यामध्ये अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर या तिघांचा समावेश आहे. तिघांकडून महत्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे.