रसिकांचं पाठबळ जोपासतोय अन् वाढवतोयही : सचिन पिळगांवकर
By admin | Published: March 14, 2017 04:12 PM2017-03-14T16:12:03+5:302017-03-14T16:12:03+5:30
रसिकांचं पाठबळ जोपासतोय अन् वाढवतोयही : सचिन पिळगांवकर
रसिकांचं पाठबळ जोपासतोय अन् वाढवतोयही : सचिन पिळगांवकर
सोलापूर- कलाक्षेत्रात काम करताना कलेला पूर्णत: न्याय देण्याचा आणि रसिकांना चांगल्यात चांगलं देण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणूनच आपणाला रसिकांचे पाठबळ मिळाले. रसिकांचे पाठबळ हे आजही माझ्यासाठी चैतन्यच असून ते जोपासत नव्या पिढीसाठी अजून भरपूर काम करायचे आहे, असे हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माते सचिन पिळगावकर यांनी केले.
दमाणी-पटेल पुरस्काराच्या निमित्ताने सोलापुरात आलेले सचिन यांनी लोकमत कार्यालयाला आवर्जुन भेट दिली. यावेळी संपादक राजा माने यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत गिरीष बलदवा व उपाध्ये यांनीही भेट दिली. हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटात अवघ्या चौथ्या वर्षी काम करुन या क्षेत्रात पाऊल टाकणारे सचिन यांनी पुढेअनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करुन लाखो रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. आजही रसिकांचे पाठबळ असल्याचे सांगत सचिन म्हणाले की, चैतन्य हे वयावर कधीच अवलंबून नसते. ते फक्त डोक्यात असावे लागते. राजाभाऊ परांजपे या दिग्गजाचे बोट धरुन या क्षेत्रात पदार्पण केले. आणि रसिकांसाठी चांगले तेच देण्याचा प्रयत्न केला. राजाभाऊ म्हणजे मास्टर विनायक यांचे वारसदार. मास्टर विनायकराव, राजाभाऊ परांजपे, राजदत्त यांचा वारसा मी चालवण्याचा प्रयत्न करत आलो आहे. अभिनेता म्हणून राजाभाऊनी मला खूप धडे दिले. अनेक दिग्गजांकडून आपणाला कलेचे धडे मिळाले आहेत. दिग्गजांचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मी आजही नव्या पिढीकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आपल्या कामावर लक्ष द्यावे व ते लोकांना कसे आवडेल हे सतत डोक्यात ठेवून आपला वारसा कसा कसा जपला जाईल यासाठी प्रयत्न करत आहे.
----------------------------------
दर्डा परिवाराला लोकांचे पाठबळ
दर्डा परिवार आणि आपले घनिष्ठ संबंध असल्याचा सचिन यांनी आवर्जुन उल्लेख केला. १९८५ पासून स्व. जवाहरलाल बाबुजी यांच्याशी आपले स्नेहसंबंध होते. त्यांच्याकडूनही बरेच काही शिकायला मिळाले. आपल्या कामाला न्याय द्यायला शिकले पाहिजे. त्यात जीव ओतला पाहिजे असे बाबुजी म्हणायचे. आज बाबुजी नसले तरी लोकमतच्या माध्यमातून ते आपल्यात असल्याचे जाणवते. लोकमत आणि दर्डा परिवाराला लोकांचे मोठे पाठबळ आहे त्यामागे त्यांची मोठी तपश्चर्या आहे, असे सचिन म्हणाले.