'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यावरुन सचिन सावंताचा राज्य सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:42 PM2022-09-12T17:42:33+5:302022-09-12T17:43:40+5:30
Sachin Sawant : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यावरुन काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
मुंबई : 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा नाही तर सरकारने 'सत्ता पंधरवडा' नाव द्यावे, अशा प्रकारे गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय, असे म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यावरुन काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
सेवाच करायची तर गांधी सप्ताह सयुक्तिक असता. वाढदिवस साजरा करण्यासाठी 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' नावाने गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय! गांधीजींचे विचार व कार्य विरुद्ध टोकाचे होते. त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये सचिन सावंतानी मराठवाडा मुक्ती संग्रामावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले. 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. वाढदिवसाच्या जल्लोषात राज्य सरकारला याचा विसर पडणे यापेक्षा मराठवाड्यावर मोठा अन्याय असू शकत नाही. मराठवाडा मुक्तीसाठी झालेला संघर्ष व त्याग आठवणे, मराठवाड्याच्या प्रगतीचा निग्रह या वर्षात अभिप्रेत आहे, असे सचिन सावंत म्हटले आहे.
सेवाच करायची तर गांधी सप्ताह सयुक्तिक असता. वाढदिवस साजरा करण्यासाठी 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' नावाने गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय! गांधीजींचे विचार व कार्य विरुद्ध टोकाचे होते. त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 12, 2022
'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'
दरम्यान, सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.