सचिन तेंडुलकर देणार मुंबईकरांना ‘स्वच्छतेचे धडे’
By admin | Published: April 23, 2016 03:33 AM2016-04-23T03:33:44+5:302016-04-23T03:33:44+5:30
मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी आता माजी क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकरनेही पुढाकार घेतला आहे़ स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीसाठी कधीही महापालिकेने हाक दिल्यास काम करण्यास तयार
मुंबई : मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी आता माजी क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकरनेही पुढाकार घेतला आहे़ स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीसाठी कधीही महापालिकेने हाक दिल्यास काम करण्यास तयार असल्याचे आश्वासन त्याने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना शुक्रवारी दिले़
गेल्या महिन्यात सचिनने पालिका आयुक्तांना पत्र लिहून देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती़ मात्र केवळ पत्र लिहून स्वस्थ न बसता सचिनने थ्रीएम या कंपनीच्या मदतीने डम्पिंग ग्राउंड व कचरा समस्येवर महिनाभर अभ्यास केला़ या कंपनीने पालिका आयुक्तांसमोर शुक्रवारी सादरीकरण केले़ आयुक्तांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी साहाय्य करण्याचे आवाहन सचिनला केले़ ही मागणी सचिनने तत्काळ मंजूर केली.
देवनार डम्पिंग ग्राउंडला भेट न देताच आयुक्तांना पत्र पाठविल्याची टीका झाल्यानंतर सचिनने डम्पिंग ग्राउंड गाठले़ तिथे प्रवेश बंदी केल्यामुळे कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ त्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती आयुक्तांना केली. सचिनच्या सासूबाई अनाबेला मेहता यांची ‘अपनालय’ संस्था आहे़ या संस्थेने आयआयटी आणि निरीच्या मदतीने देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीबाबत महिनाभर सर्वेक्षण केले आणि आयुक्तांसमोर सादरीकरण केले.