आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा; सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:58 AM2019-12-25T11:58:39+5:302019-12-25T11:59:11+5:30
सचिनला याआधी X सुरक्षा देण्यात आली होती. ती आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सचिनसोबत यापुढे 24 तास पोलीस कर्मचारी राहणार नसून एस्कॉर्ट सर्व्हीस पुरविण्यात येणार आहे. तर भाजपनेते एकनाथ खडसे यांच्या Y सुरक्षेतील एस्कॉर्टला हटविण्यात आले आहे.
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अनेक व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 97 व्हीआयपीना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी 29 व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त धोके लक्षात घेत 16 लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी Y+ सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता त्यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सुरक्षाही Y+ वरून Z करण्यात आली आहे.
दरम्यान सचिनला याआधी X सुरक्षा देण्यात आली होती. ती आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सचिनसोबत यापुढे 24 तास पोलीस कर्मचारी राहणार नसून एस्कॉर्ट सर्व्हीस पुरविण्यात येणार आहे. तर भाजपनेते एकनाथ खडसे यांच्या Y सुरक्षेतील एस्कॉर्टला हटविण्यात आले आहे.