वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:27 AM2024-08-12T06:27:33+5:302024-08-12T06:28:35+5:30
"परमबीर सिंह भाजपला शरण जाऊन फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत"
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे दावे करीत आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला.
फडणवीस यांनी ३ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी जे कटकारस्थान रचले होते, ते मी १५ दिवसांपूर्वी जनतेसमोर आणले. त्यामुळे फडणवीसांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना पुढे केले आहे. वाझे हा देशद्रोहाच्या व दोन खुनांच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीमध्ये स्फोटके ठेवणे आणि नंतर गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्ह्यांचा परमबीर सिंह सूत्रधार आहे. दोघेही फडणवीस यांच्या सांगण्यावरून बोलत आहेत, अशी टीका देशमुख यांनी एक्स समाजमाध्यमाद्वारे केली आहे.
परमबीर सिंह यांना आम्ही ३ वर्षांपूर्वी निलंबित केले होते, तेव्हाच त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून अटक होणार होती, पण भाजपला शरण जाऊन आता ते फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत, अशी टीकाही देशमुख यांनी केली.