स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:11 AM2021-03-16T03:11:42+5:302021-03-16T06:55:28+5:30

स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे  २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी  वाझे व मनसुख हिरेन यांची  भेट झाली होती.

Sachin vaze's fingerprints found on Scorpio, evidence found NIA | स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे 

स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे 

Next

मुंबई : स्फोटक कारच्या तपासात एनआयएच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या  सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे त्या स्काॅर्पिओवर आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोव्हाच्या नंबर प्लेटही ते कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता  विभागाकडून (सीआययू) वारंवार बदलण्यात येत  असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sachin vaze's fingerprints found on Scorpio, evidence found NIA)

स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे  २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी  वाझे व मनसुख हिरेन यांची  भेट झाली होती. घराबाहेर स्कॉर्पिओ कार सापडली. त्याचदिवशी सकाळी वाझे हे मुंबईत मनसुख हिरेन यांना भेटले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. सीआययू वापरत असलेल्या इनोव्हाचे बनावट नंबर प्लेट त्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून बदलण्यात येत होते. ठाण्यातील एका दुकानातून ते बनविण्यात आले होते. त्या दुकानातील मालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. वाझेंच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांना नंबरप्लेट बनवून देत होतो. २७ फेब्रुवारीला दुकानात येऊन त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग ताब्यात घेतले होते, असा जबाब त्याने अधिकाऱ्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. 

एनआयएने  याबाबत तांत्रिक पुरावे शोधण्यावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी   गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) कार्यालय असलेल्या पोलीस आयुक्तालयाच्या दोन किलोमीटर अंतरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. परिसरातील सर्व कॅमेऱ्यातील  २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीतील  सर्व फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्याची एका पथकाकडून सूक्ष्म पडताळणी केली जात आहे.

पीपीई किटमधील ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच ? 
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सापडलेल्या जिलेटिन असलेल्या स्काॅर्पिओची पीपीई किट घालून पाहणी करणारी व्यक्ती ही पोलीस अधिकारी सचिन वाझेच असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे. 

- अंबानी यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये २४ फेब्रुवारीला मध्यरात्री या कटात सहभागी असलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार परिसरात फेऱ्या मारताना दिसली. त्यामधून ड्रायव्हर बाहेर येऊन स्काॅर्पिओची पाहणी करतो. मात्र, त्याने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातले होते. 

- ही व्यक्ती सचिन वाझेच आहे का, हे तपासण्यासाठी एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करून चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालींवरून तसेच तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून त्याबद्दल अंतिम निष्कर्ष काढला जाईल.

जे. जे. रुग्णालयात पाच तास तपासणी
अटकेत असलेल्या वाझे यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. रविवारी मध्यरात्री तब्येत बिघडल्याने रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली हाेती. त्यानंतर साेमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयात नेले. तेथे दुपारी ५ तास त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.

- एनआयएकडून सीआययूच्या अधिकाऱ्यांची दुसऱ्या दिवशी झाडाझडती, दोघांवरही अटकेची टांगती तलवार ! 

- वाझे यांच्या सहकाऱ्यांकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) झाडाझडती सुरू आहे. गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे साहाय्यक निरीक्षक रियाझ काझी  व होवाळे यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू असून, त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. 
- घटनास्थळी जाऊन गाडी पार्क करणे, इनोव्हाच्या नंबर प्लेट बदलणे आदींमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे  वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांनी याबाबत अन्यही जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले जाते. 
- त्याबाबत त्यांच्याकडे सखोल विचारणा केली जात आहे. एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात रविवारी रियाझ काझी व होवाळे यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.
 

Web Title: Sachin vaze's fingerprints found on Scorpio, evidence found NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.