सचिनसाठी मिळेना क्रिकेटच्या पंढरीत जागा !

By admin | Published: June 22, 2016 08:00 AM2016-06-22T08:00:22+5:302016-06-22T09:31:48+5:30

कोट्यवधी भारतीयांच्या मनात वास्तव्य करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी क्रिकेटच्या पंढरीत-मुंबईत जागा मिळत नसल्याच्या आश्चर्यकारक वास्तवाने त्याचे असंख्य चाहते बेचैन झाले आहेत.

Sachin's place in the heart of cricket! | सचिनसाठी मिळेना क्रिकेटच्या पंढरीत जागा !

सचिनसाठी मिळेना क्रिकेटच्या पंढरीत जागा !

Next

चंद्रशेखर कुलकर्णी

मुंबई, दि. २१ - कोट्यवधी भारतीयांच्या मनात वास्तव्य करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी क्रिकेटच्या पंढरीत-मुंबईत जागा मिळत नसल्याच्या आश्चर्यकारक वास्तवाने त्याचे असंख्य चाहते बेचैन झाले आहेत. लंडनच्या मादाम तुसॉ पासून अनेक ठिकाणी प्रतिष्ठापना झालेल्या सचिनच्या दोन शिल्पाकृती आजमितीस जागेच्या शोधात आहेत.

या परिस्थितीत बीकेसीतील मुंबई क्रिकेट असोसिएशन तरी आपल्या अंगणात सचिनसाठी जागा देईल का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तसे पाहिले तर पोट भरण्याची व्यवस्था करणाऱ्या डबेवाल्यांपासून मन आनंदाने भरणाऱ्या सचिनपर्यंत अनेक कलाकृतींवर अडगळीत पडण्याची वेळ आली आहे.

प्रख्यात कलाप्रेमी उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या आरपीजी आर्ट फाउंडेशनने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ मरिन ड्राइव्हवर त्याचा चेहरा असलेले मेटल आर्टपीस उभारले होते. जयदीप मेहरोत्रा यांची ही कलाकृती उभारण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. ती धातूतील शिल्पाकृती मरिन ड्राइव्हवर स्थानापन्न झाली. त्या निमित्ताने त्या लगतचा पट्टा स्वच्छ झाला. सुशोभितही झाला. पण सहा-सात महिन्यांच्या आतच ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियमपासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी पालिका आणि पुरातन वास्तू संवर्धन समितीकडे तक्रार करुन सचिनचे शिल्प हटविण्याची मागणी केली.

त्यानुसार आधी परवानगी देणाऱ्या पालिकेनेच यंदाच्या जानेवारीत आरपीजी फाउंडेशनला शिल्पाकृती हटविण्याची नोटीस बजावली. अलीकडेच पुन्हा नोटीस बजावली आणि सचिनचा आर्टपीस २४ तासांत तिथून हटविला गेला.विस्थापित झालेल्या सचिन तेंडुलकरला या मुंबापुरीत मोक्याची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आरपीजी फाऊंडेशनचा अशा कलाकृतींच्या उभारणीमागील हेतू ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ला साह्य करण्याचा आहे. त्या हेतुची खात्री पटल्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनीही सचिनला जागा मिळवून देण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या अनेक वॉर्डांमधील वाहतूक बेटांची व अन्य जागांची त्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. 



एमसीएचा पर्याय
या परिस्थितीत बांद्रा कुर्ला संकुलातील एमसीएच्या विस्तीर्ण जागेत सचिनसाठी जागा मिळू शकते. अडचण इतकीच आहे, की ती जागा सार्वजनिक नाही. तसेच अशा होकारासाठी एमसीएतून कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. 

सी व्ह्यूच्या मार्गात सचिनचे शिल्प

उच्चभ्रू वसाहती असलेल्या मरीन ड्राईव्हच्या नागरिकांनी सी व्ह्यू दिसत नसल्याची तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत पुरातन वास्तू समतिीने शिल्पामुळे पुरातन सौंदर्य खराब होत असल्याचे मत व्यक्त करीत शिल्पाला परवानगी नाकारली.




वस्तुत: हा प्रश्न केवळ सचिनच्या आर्टपीसपुरता नाही. तो कलेकडे पाहण्याच्या आणि त्याचवेळी शहराच्या स्वच्छतेचा, सौंदर्यीकरणाचाही आहे. देशाने स्वीकारलेल्या स्वच्छ भारत अभियानला हातभार लावण्यासाठी मुंबईत आरपीजी फाऊंडेशनने पुढाकार घेतला. शहराच्या सौंदर्यात भर टाकतील, स्वच्छतेच्या संस्कृतीचे अप्रत्यक्ष रोपण करतील अशा कलाकृती नामवंत कलाकारांकडून खरेदी करणाऱ्या फाऊंडेशनने त्या बसविण्यासाठी घेतलेल्या जागांच्या भाड्याचा खर्चही उचलला.

त्यात डबेवाल्यांच्या शिल्पाकृतीसह अन्य चार कलाकृतींचा समावेश आहे. वलय शेंडे, अरझान खंबाटा, जयदीप मेहरोत्रा आणि सुनील पडवळ आदी कलावंतांच्या कलाकृती त्यासाठी मिळविल्या गेल्या. पण त्यांच्या उभारणीत अनेक अडसर येत आहेत. उपनगरांपासून नरीमन पॉइंटपर्यंत अनेक ठिकाणी सार्वजनिक जागी अशा कलाकृती उभारण्याची कल्पना लोकांच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहे. 

जगभरात अनेक शहरांमध्ये या पद्धतीच्या कलाकृतींनी तेथील सौंदर्यात भर तर टाकलीच आहे. शिवाय त्या कलाकृती शहरांची ओळखही बनल्या आहेत. 




डबेवाल्यांच्या शिल्पालाही होकाराची प्रतीक्षा

मेट्रो जंक्शन येथे वलय शेंडे निर्मित डबेवाल्यांचे शिल्प बसविण्याचा या संस्थेचा मानस आहे. वांद्रे येथील कार्टर रोडला समुद्रालगत सुनील पडवळ यांनी तयार केलेली आगळी कलाकृती उभी राहणे अपेक्षित आहे. विचारांना चालना देतानाच डोळयाचे पारणे फेडणाऱ्या तसेच शहराच्या ओळखीला नवा दृश्य आयाम देणारी कला हे आपले वैभव आहे. त्याच्या साह्याने समाजातील विविधतेचा हा वारसा साजरा आणि वृद्धींगत करण्याचे हे एक माध्यम आहे.

- हर्ष गोएंका

Web Title: Sachin's place in the heart of cricket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.