‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 05:37 AM2022-10-08T05:37:17+5:302022-10-08T05:37:44+5:30

संप काळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

sacked st employees reinstated case of attack on sharad pawar house | ‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण

‘ते’ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे प्रकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई: संप काळात शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल १७५ दिवसांचा संप केला होता. या संपकाळात एसटी महामंडळाने १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. याच काळात संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढत हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील १७५ जणांना पोलिसांनी अटकही केली होती.   

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मुदतीत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे १७५ कर्मचारी तुरुंगात असल्याने वेळेत हजर होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची बडतर्फी कायम राहिली होती. 

मंत्रालयात शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचे पगार, एसटी फायद्यात आणण्याबाबत करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा झाली. याच बैठकीत बडतर्फी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एसटी ताफ्यात आता इलेक्ट्रिक बसगाड्या 

एसटीच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे तर जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जाणार आहेत. तसेच मार्च २०२३ पर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्याचा तसेच बसेसची संख्याही वाढवण्याचा आराखडा महामंडळाने  केला आहे.  

‘डीबीओएलटी’ तत्त्वावर बसपोर्टचा विकास

एसटी महामंडळाची सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टर जागा असून, त्यातील ५ शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या १८ जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड-ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून एसटीला सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे. 

मालवाहतुकीतून १०७ कोटींचे उत्पन्न  

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७ कोटी ८० लाखांचे उत्पन्न मिळाले असून, शासकीय अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: sacked st employees reinstated case of attack on sharad pawar house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.