सदाभाऊंना जाब विचारणार!
By admin | Published: June 29, 2017 01:26 AM2017-06-29T01:26:03+5:302017-06-29T01:26:03+5:30
पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. यासाठी एका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीसमोर सदाभाऊंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये राहणार की नाही, याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘सदाभाऊ खोत यांची भूमिका येथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. मी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मांडतील.’’
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद असल्याचे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरून ध्यानात आले आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांना लाभ होत असेल तर शेतकऱ्यांमध्ये एवढा असंतोष का आहे? एका बाजूला मुख्यमंत्री दावा करतात, की राज्यावर प्रतिमाणसी सरासरी ५४ हजार रुपयांचे कर्ज आहे. परंतु, ती आकडेवारी चुकीची असली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जी मामुली मदत सरकारने देऊ केलीय त्याच्याशी स्वाभिमानी असहमत आहे. कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांना काय लाभ होणार, याबाबत स्पष्टता नाही.’’ सरकारला कर्जमाफीसाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर संघटना निर्णय घेण्यास सक्षम आहे, असेही त्यांनी जाहीर केले.