सदाभाऊ खोतांवर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न, एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:59 PM2017-10-04T13:59:28+5:302017-10-04T14:54:42+5:30
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला आहे. या प्रकऱणी सिकंदर शहा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यवतमाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला आहे. यवतमाळ येथे विषबाधा झालेल्या शेतक-यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकऱणी सिकंदर शहा नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पिकांवर कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या १८ मृत्यूची दखल घेऊन बुधवारी जिल्हा दौ-यावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शेतक-यांच्याच रोषाचा सामना करावा लागला. त्यांच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समितीने निदर्शने केले. खोत यांच्यावर फवारणीचा अयशस्वी प्रयत्न करणा-या कार्यकर्त्याला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले.
सदाभाऊ खोत बुधवारी यवतमाळात दाखल झाले. त्यांनी आर्णी तालुक्यातील विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवाय शेतीचीही पाहणी केली. सदाभाऊ खोत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषबाधित रुग्णांच्या भेटीसाठी येणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी व शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी तेथे निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र ना. खोत यांना तेथे येण्यास बराच विलंब लागल्याने कार्यकर्ते चिडले. दुपारी २ वाजता खोत तेथे आले असता शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा वारकरी शेतकरी संघटनेचे प्रमुख सिकंदर शाह यांनी सदाभाऊंवर फवाºयातून पाणी उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा डाव लक्षात आल्याने पोलिसांनी वेळीच शहा यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची चांगलीच हुज्जत झाली. ना. खोत यांनी यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कार्यकर्त्यांना टाळण्यासाठी नियोजित नसताना ना. खोत यांनी आर्णीचा दौरा करून जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. रुग्णांच्या भेटीनंतर ना. खोत जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसाठी रवाना झाले.
वैद्यकीय महाविद्यालयातील आंदोलनात प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, वजाहत मिर्झा, राहुल ठाकरे, वसंत घुईखेडकर, अनिल गायकवाड, अरुण राऊत, सुरेश चिंचोळकर, नंदिणी दरणे, जितेंद्र मोघे, विजय काळे, विक्की राऊत, बालू दरणे, स्वाती दरणे, शशीकांत देशमुख, बालू काळे, बबलू देशमुख, नितीन गुघाणे, नीलेश देशमुख, घनशाम दरणे, प्रकाश घोटेकर, करीम पठाण, पुंडलिक मिरासे, प्रसाद ठाकरे, नितीन टारपे, शुभम लांडगे, साहेबराव पाटील, संतोष गायकवाड, विशाल झाडे आदी उपस्थित होते.