तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:41 PM2021-04-12T13:41:55+5:302021-04-12T13:48:49+5:30
Pandharpur ByPoll: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत यांनी हजेरी लावली.
पंढरपूर:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक (Pandharpur ByPoll) होणार आहे. देशभरातील पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राज्यातही प्रचाराचे रण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा सुरू असताना अचानक पाऊस पडला. मात्र, जयंत पाटील यांनी सभा सुरूच ठेवली. यावरून, पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. (sadabhau khot criticise jayant patil on election campaign)
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहेत, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही; भाजपचा एल्गार
तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा
जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा, अशी मागणी खोत यांनी केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, असे खोत यांनी सांगितले.
अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत
अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत. निवडणुकीपूर्वी अजित पवार सातबारा कोरा करणार, असे सांगत होते. नाही केले तर पवार आडनाव लावणार नाही, असेही म्हणाले होते, अशी आठवण सदाभाऊ खोत यांनी यावेळी करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, असा निर्धार भाजपने केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होताना दिसत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.