“राष्ट्रवादी पक्ष नाही तर अलिबाबा, चाळीस चोरांची टोळी”; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:08 PM2023-07-02T13:08:37+5:302023-07-02T13:09:30+5:30
Sadabhau Khot Vs NCP: शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती, शकुनीमामा सारखे सोंगाट्याचा डाव खेळला होता, अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली.
Sadabhau Khot Vs NCP: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी याप्रकरणी भाष्य करत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. शेतकरी मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी चौफेर फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सहकारी कारखाना बंद पडला की, लगेचच घेतात. बंद पण हेच पाडतात. खासगी करुन हेच चालवतात, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सध्याच्या महाभारतातील शरद पवार हे शकुनी मामा
शरद पवार यांच्या ताब्यात जवळपास ५० कारखाने आहेत. सहकारीमध्ये खासगीकरण करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा शरद पवारांचा उल्लेख हा शकुनी मामा असा केला जाईल. सध्याच्या महाभारतातील शरद पवार हे शकुनी मामा असल्याची खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष बेकायदेशीर होते. क्रिकेटचा अध्यक्ष कोणी असावे की, ज्याला बॅटिंग करायला येते, बॉलिंग करायला येते, फील्डिंग करायला, येते पण शरद पवार यांना काहीच येत नाही. शरद पवारसाहेब कुस्ती संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कधी कुस्त्या गाजवल्या नाहीत. हिंदकेसरी कधी मिळवला आहे का हे कधी ऐकले नाही, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, जिथे पैसा तिथे पवार घराणे आहे. पैसा यायला लागला की ते कशाचेही अध्यक्ष होतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती. तर, महाभारतात शकुनीमामा डाव टाकून जसे पांडवांचे राज्य हिरावून घेतो. त्याच पद्धतीने त्यांनी शकुनीमामा सारखेच सोंगाट्याचा डाव खेळला होता. भाजप-शिवसेनेचे सरकार घालवले होते, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला.