सदाभाऊ फसवा माणूस, राष्ट्रवादीशी माझा संबंध नाही, मी तर..; हॉटेल मालकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:07 PM2022-06-17T15:07:25+5:302022-06-17T15:08:21+5:30
सदाभाऊ खोत यांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करत माझ्यावर हल्ल्याचं षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा डाव आहे असा आरोप केला. त्यावर हॉटेल मालक अशोक शिनगारेंनी प्रत्युत्तर दिले.
पंढरपूर - रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ एका हॉटेल मालकानं थकलेल्या बिलावरून सदाभाऊ खोत यांना रस्त्यात गाठलं. सांगोला दौऱ्यावर असताना खोत गाडीतून उतरल्यानंतर अशोक शिनगारे नावाच्या हॉटेल व्यावसायिकाने त्यांना थकीत बिलाची रक्कम मागितली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता गदारोळ माजला आहे.
सदाभाऊ खोत यांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करत माझ्यावर हल्ल्याचं षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा डाव आहे असा आरोप केला. त्यावर हॉटेल मालक अशोक शिनगारेंनी प्रत्युत्तर दिले. अशोक शिनगारे म्हणाले की, सदाभाऊ खोत हा फसवा माणूस आहे, काहीही बोलतील, आता हे जगजाहीर झाले आहे. मी संघटनेचे काम करत होतो म्हणून सदाभाऊंवर माझं प्रेम होते. मी वाळूमाफिया आहे. शरद पवारांसारख्या माणसाला बदनाम करत आहेत मग माझ्यासारख्याला बदनाम का करू नये. भाजपाचा हा पेशा आहे. मी तंतोतंत आकडा सांगू शकत नाही. पण माझे ६६ हजार ४५० रुपये बिल द्याव असं त्यांनी म्हटलं.
तसेच मी खोटेनाटे बोललो तरी त्याची चौकशी व्हावी. सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतील नेते आहे. माझा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. मी शेतकरी संघटनेचा चळवळीचा कार्यकर्ता आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलनाचे विविध गुन्हे आहेत. याची खातरजमा सदाभाऊंनी करावी. मला स्वत: सागर खोत हे भेटायला आले होते. त्यांच्या सांगण्यावरून ८ ते १० दिवस कार्यकर्ते जेवण खायला येत होते. मला सागर म्हणाले तुमचं बिल लाख होऊ द्या अन्यथा दीड लाख भरून देऊ असं त्यांनी सांगितल्याचं अशोक शिनगारे म्हणाले.
"माझ्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र, परंतु त्याचं टायमिंग चुकले अन्...; सदाभाऊंचा दावा
दरम्यान, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर गुन्हा दाखल करून सदाभाऊ मोठे होणार असतील तर जरूर करावं. परंतु माझ्या हॉटेलचं थकलेले बिल द्यावे. मी जमीन विकून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे हे २ तालुक्याला माहिती आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना माझी परिस्थिती माहिती आहे असंही अशोक शिनगारे यांनी सांगितले.
सांगोला दौऱ्यावर सदाभाऊ खोत यांना हॉटेल मालकाने घेरलं, माझे मला पैसे परत द्या म्हणून विचारलं #SadabhauKhotpic.twitter.com/yefK59GjRm
— Lokmat (@lokmat) June 16, 2022
अडवणाऱ्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी - खोत
राष्ट्रवादीच्या टॉमोटोसारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच खोत यांनी मिडिया समोर वाचला. ३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे ही सगळी माहिती समोर आली. हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बंगळुरू येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्याबद्दल देखील गुन्हा नोंद आहे. अशा व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे असा आरोप सदाभाऊंनी केला.