आमची लेकरं बरोबरच...त्यांचं कायबी चुकलेलं न्हाय ! महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या आईंनी ठणकावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 06:54 PM2017-08-22T18:54:46+5:302017-08-22T20:00:43+5:30
आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत.
मुंबई दि. 22 - आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत. त्यातील एक आई होती कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांची तर दुसर्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री.. निमित्त होते मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या आई या खास कार्यक्रमाचं.
आईची गाणी आणि अनेक मान्यवरांनी आई विषयी व्यक्त केलेल्या भाव- भावना यांचा कलात्मक अविष्कार अनिल हर्डिकर यांनी आई या कार्यक्रमात केला आहे. त्याचा विशेष प्रयोग सोमवारी रंगशारदा येथे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि त्यांची आई गुणाबाई जानकर, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची आई रत्नाबाई खोत यांची विशेष उपस्थीती होती. यावेळी या दोघींना मानपत्र देऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार आशिष शेलार यांची आई मीनल शेलार या देखिल उपस्थित होत्या.
तुमची मुलं मंत्री झाल्यापासून बिघडली... असा आरोप काही लोक करीत आहेत असा सवाल रत्नाबाई खोत आणि गुणाबाई जानकर यांना विचारला असता दोघीही कडाडल्या.. “आमची लेकरं बरोबर आहेत, त्यांच कायबी चुकलेलं नाय! ते काही बिघडले नाहीत ते दोघंही चांगलं काम करीत आहेत” अशी पोचपावतीही दिली. तर तुम्ही आईचा शेवटचा मार कधी खाल्ला होतात? असा प्रश्न दोन मंत्र्यांना विचारताच दोघांनीही आपल्या बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला. माझी आई दोनच दिवसापूर्वी रुसली होती आणि गावी निघून गेली होती आजच तिला पुन्हा मुंबईत घेऊन आलो आहे असे सांगत सदाभाऊंनी सभागृहात एकच हशा पिकवून दिला. सदाभाऊ शेतकरी नेते आहेत. त्यांना शेतीची कामे करता येतात का? असा प्रश्न विचारताच रत्नाबाई खोत यांनी शेतीची नांगरण, भांगलण सदाभाऊ करतात शेण काढतात असे सांगत उपस्थितांना थक्क करून सोडले. तर तुम्हाला शरद पवार साहेब आवडतात का? असा प्रश्न गुणाबाई जानकर यांना विचारला असता.. हो आवडतात की.. असेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. खासदार राजू शेट्टी सदाभाऊंवर नाराज आहेत या दोन लेकरांमध्ये कोण चुकतंय आई? असा प्रश्न करताच रत्नाबाई खोत यांनी आपलं लेकरू बरोबर आहे हे पुन्हा एकदा ठणकावले आणि सभागृहात जोरदार टाळयांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाचा समारोप करताना आयोजक आमदार आशिष शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.
रत्नाबाई खोत आणि गुणाबाई जानकर या दोघीही बोलत्या झाल्याचे पाहून मीनल शेलार याही बोलत्या झाल्या आणि त्यांनी आशिष शेलार यांच्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्याशी पत्रकार प्रशांत डिंगणकर यांनी संवाद साधला. आई विषयी गाणी गायिका माधुरी करमरकर, ऋषीकेश रानडे, जय आजगावर, ज्ञानेश पेंढारकार आणि अर्चना गोरे यांनी सादर केली तर अनिल हर्डिकर, प्रतिक्षा लोणकर यांनी कार्यक्रामाचे निवेदन केले.