Union Budget 2022: “शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प”: सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:53 PM2022-02-01T16:53:59+5:302022-02-01T16:54:48+5:30
Union Budget 2022: अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. तब्बल दीड तास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यानंतर अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असली, तरी अनेकांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत केले आहे. यातच राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला आहे. या देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा हमीभावाने खरेदी करु, अशी महत्त्वपूर्ण घोषणा संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. यातून या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
बाजारपेठेला चालना देण्याची सुद्धा भूमिका
वन स्टेशन - वन प्रोडक्ट या योजनेतून या देशांमध्ये बाजारपेठेला चालना देण्याची सुद्धा भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करून सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. सर्व पिकांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे, असे सांगत देशामध्ये कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे, हे देखील सुलभरित्या कळणार आहे, असे खोत यांनी सांगितले.
रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात उभे करणार
देशात अधिकाधिक शेतकऱ्यांचा शेतमाल हा कमी खर्चात आणि वेगाने बाजारपेठेत कसा पोहोचवायचा, यासाठी रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात उभ्या करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. शेतीमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. शेतीमध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे, त्यासाठी शेती विषयक महाविद्यालयचे जाळ उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषीच्या स्टार्टअप योजनेसाठी नाबार्ड योजनेअंतर्गत तरुणांना थेट कर्जपुरवठा करण्याची घोषणा केल्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगांना देखील उभारी मिळणार आहे, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी बाराबलुतेदार यांच्या हाताला काम कसं मिळेल, छोटे छोटे उद्योगधंदे कसे उभे राहतील, त्यासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी केली जाईल, हे डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अशाप्रकारे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केलेला अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो, असेही ते म्हणाले.