"शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा, एवढंच संजय राऊत म्हणायचे राहिलेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:15 PM2022-06-15T20:15:55+5:302022-06-15T20:16:45+5:30
सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेला टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून याबाबत फारशी सकारात्मक मतं नाहीत. पण तसं असलं तरी इतर अनेक पक्षांची नेतेमंडळी अजूनही शरद पवार यांचेच नाव घेताना दिसत आहेत. यात, शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील शरद पवार यांच्या नावासाठी आग्रही आहेत. मात्र, याच मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
"संजय राऊतांचे अभिनंदन करेन की ते असं म्हणाले नाहीत, की शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा. एवढेच म्हणायचे राहिलेत, पण शरद पवार यांनी सांगितले की मी उमेदवार नाही. संजय राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे. सकाळी सकाळी नाष्टा झाला की संजय राऊताचे तोंड बघायला लागते. संजय राऊतांचे तोंड बघितलं, की दिवसभर काम होईना असं झालं आहे आणि सरकारला वेळ नाही. त्यामुळे या विनोदवीरांनी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे", असे सदाभाऊ खोत म्हणाले.
"पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावला. रामाकडे जा नाही तर काशीत अंघोळ करा. राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपला आहात. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, तेच आता आयोध्येला निघाले आहेत", असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेला लगावला.