“जरांगेंमुळे अनेक जण खासदार, आता त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की...”; सदाभाऊ खोतांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:25 PM2024-06-25T19:25:27+5:302024-06-25T19:26:13+5:30
Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील करत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या खासदारांकडून आता एक पत्र लिहून घ्यावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: सगेसोयरेच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. १३ जून रोजी सगेसोयरे अंमलबजावणी बाबतचे बेमुदत उपोषण सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन स्थगित करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. १२ दिवसानंतर त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन जरांगे पाटलांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. यातच सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे यांना एक आव्हान दिले आहे.
मीडियाशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी करत असलेले काम कौतुकास्पद आहे. यावेळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपल्या आशीर्वादामुळे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक खासदार निवडून आले. माझी एक विनंती आहे की, या प्रत्येक खासदारांकडून एक पत्र लिहून घ्या की, मराठा समाजाला १०० टक्के ओबीसीमध्ये समावेश करायला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाज जोपर्यंत ओबीसीमध्ये जाणार नाही, तोपर्यंत हे खासदार तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला हे समजणे महत्त्वाचे आहे
अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून लेखी लिहून घ्यावे. तसेच एक पत्र शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावे. सुप्रिया सुळे यांच्याकडून लिहून घ्यावे. रोहित पवार यांच्याकडून लिहून घ्यावे की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये १०० टक्के समावेश झालाच पाहिजे. असे पत्र जर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या खासदारांकडून लिहून घेतले, तर आम्हाला निश्चित समजेल की, मनोज जरांगे जे काम करत आहेत, ते योग्य दिशेने सुरू आहे. अशी जर पत्र लिहून घेतली नाहीत, तर जनतेत अशा प्रकारचा मेसेज जाईल की, मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत होते. हे कुठेतरी स्पष्ट होणे आणि महाराष्ट्रातील जनतेला समजणे महत्त्वाचे आहे, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळ परिसरात गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती. त्याच बरोबर गावात प्रवेश करताच महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षण केले. पुष्पवृष्टी करून जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.