सदाभाऊंचा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण- राजू शेट्टी

By admin | Published: June 12, 2017 06:22 PM2017-06-12T18:22:03+5:302017-06-12T18:22:03+5:30

शेतकरी आंदोलनाच्या यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम होत आहे.

Sadabhau's issue is in our point of view - Raju Shetty | सदाभाऊंचा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण- राजू शेट्टी

सदाभाऊंचा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण- राजू शेट्टी

Next

ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 12 - शेतकरी आंदोलनाच्या यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम होत आहे. संघटनेचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते महत्वाचे आहेत. सदाभाऊंचा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण आहे. घात आल्यानंतर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल, तरच उगवण चांगली होईल, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत मारला.
भाजपाने कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली आहे. मात्र प्रत्यक्ष कृतीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपबद्दल अडीच वर्षांच्या सहवासानंतर आमची मते तयार झाली आहेत. त्यामुळे एक मागणी मान्य झाल्यावर आमची मते बदलणार नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुंबईतून परतलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी कार्यकर्त्यांसमवेत इस्लामपूर शहरातून रॅली काढली. पंचायत समितीमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तहसील कचेरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2 जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकीत कर्जे माफ करण्याची घोषणा केली. मात्र सरकारची ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने हे आंदोलन पुढे सुरू राहिले. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे, हा आमचा आग्रह सरकारने मान्य केला. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
बड्या कर्जदारांना लाभ न देण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम होते. आमचा लढा सामान्य शेतकऱ्यांसाठी असल्याने तसेच जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे यासाठी होता. नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील कमी दर, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी कर्जातच रहात होता. शेतीचा व्याप जेवढा मोठा, तेवढे कर्जही मोठे, या
न्यायानेही या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा.
ते म्हणाले की, सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी, ठेकेदार, आयकर भरणारे अशा विविध निकषांवर कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीत शेतीची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पीक कर्ज माफ करण्याचा प्रामुख्याने विचार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. सरकार कर्जमाफीसाठी तरतूद करेल. एक ते दोन दिवसात कर्जमाफीबाबतच्या कार्यवाहीसाठी समिती गठीत केली जाईल. २५ जुलैच्या आत कार्यवाही झाली नाही तर २६ जुलैपासून पुन्हा आंदोलन करणार आहोत.

स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबावगट
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारच नाहीत, यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे. १६ जूनरोजी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन चळवळीचा दबावगट निर्माण करणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
शेतकरी आंदोलनाचा काहींना प्रसाद!
शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील काही नेत्यांना प्रसाद मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांत जाणारा भाजीपाला पुरवठा रोखून रेल रोको, चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला.

Web Title: Sadabhau's issue is in our point of view - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.