विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सदानंद देशमुख
By admin | Published: December 30, 2015 12:04 AM2015-12-30T00:04:04+5:302015-12-30T00:04:04+5:30
६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘बारोमास’कार डॉ. सदानंद देशमुख यांची निवड.
बुलडाणा : ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'बारोमास'कार डॉ. सदानंद देशमुख यांची निवड झाली आहे. चंद्रपूर येथे मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे हे संमेलन २९ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले आहे. डॉ. देशमुख यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या साहित्य वतरुळात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ.देशमुख यांचे ललित, कविता, कथा आदी क्षेत्रात मोठे योगदान असून 'बारोमास' या कादंबरीला साहित्य अकादमीचा वाड:मय पुरस्कारही प्राप्त झाला. या कादंबरीचा इंग्रजी व हिंदीमध्ये अनुवादही झाला असून. त्यावर चित्रपटही येऊ घातला आहे. खुंदळघास, गाभूळगाभा, रगडा, लचांड, उठावण, महालूट हे कथासंग्रह, गावकळा हा कवितासंग्रह, भुई रिंगणी हे ललित गद्य ही त्यांची वाड:मय संपदा आहे. याशिवाय बळ घेऊन भुईच व जमीन जुमला ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. पूणे विद्यापीठात 'विशेष ग्रंथकार' म्हणून त्यांच्या पुस्तकाची एमएच्या अभ्यासक्रमात वर्णी लागली आहे, हे विशेष महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना.आपटे पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु.ल. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले. जळगाव येथील भंवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने डॉ.सदानंद देशमुख यांना पद्मङ्म्री ना.धों.महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्काराने गौरविले. सोलापूरच्या सुशील फोरमतर्फे सुशीलकुमार शिंदे साहित्य पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या साहित्यावर मान्यवरांनी संशोधन केले.