सदाभाऊंची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना काय मिळाले? - उद्धव ठाकरे
By admin | Published: June 27, 2017 08:26 AM2017-06-27T08:26:42+5:302017-06-27T08:26:42+5:30
कृषीमंत्री सदाभाऊ खोत ऋणमुक्त झालेत मात्र, राज्यातील शेतक-यांना काय मिळाले, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वडिलांच्या आजारपणावेळी घेतलेले पैसे खासदार राजू शेट्टी यांना परत करुन ते शेट्टींच्या कर्जातून मुक्त झालेत. खोत यांच्या वडिलांच्या उपचारासाठी शेट्टी यांनी आर्थिक मदत केली होती. मात्र, या मदतीबाबत शेट्टी यांच्या समर्थकांकडून खोटा प्रचार करण्यात आल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. त्यामुळे खोत यांनी तातडीने अडीच लाख रुपये बँकेत भरून ते शेट्टी यांना परत केले. तसेच याबाबत शेट्टी यांना खरमरीत पत्र लिहिले.
यासंदर्भातच आजचे सामना संपादकीय आहे. सदाभाऊंना आर्थिक मदत केल्याची बोंब राजू शेट्टींनी ठोकल्याची नोंददेखील कुठे दिसत नाही. मात्र तरीही सदाभाऊंनी राजू शेट्टींना अडीच लाख परत केल्याची ‘बँक पावती’ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून काय मिळवले ते त्यांचे त्यांनाच माहीत, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे.
"सदाभाऊंना मोकळे वाटले. त्यांचा स्वाभिमान टिकून राहिला. सोशल मीडियाचे मनोरंजन झाले. शेतकऱ्यांना काय मिळाले?", हा मुद्दा उपस्थित करत सदाभाऊंच्या कर्जमुक्तीचा संदर्भ उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी या विषयाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?
‘भल्या भल्यांना लावील बट्टा, अशी ही थट्टा’ असे नेहमीच म्हटले गेले. सत्तेची जहाल नशा हासुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यापासून गेल्या आठवडय़ात घेतलेली ऋणमुक्ती. महाराष्ट्रातील शेतकरी अद्यापि पूर्णपणे ऋणमुक्त व्हायचा आहे व त्यावर बराच काथ्याकूट सुरू आहे, पण सरकारमध्ये मंत्री झालेले शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे अडीच लाखांचे कर्ज फेडून कर्जमुक्त झाल्याची घोषणा मध्यंतरी केली. वडिलांच्या आजारपणात सदाभाऊंनी राजू शेट्टी यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते. शेट्टी व खोत यांच्यातले संबंध अति मधुर असतानाचा हा कौटुंबिक व्यवहार होता. दोघांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ हे नाते तेव्हा भल्या भल्यांना भंडावून सोडत होते. फक्त शरीर वेगळे, पण ‘जान’ एक असे हे मित्रत्वाचे नाते दोघांत होते. त्यावेळी friend in need is friend in deed’ या उक्तीस जागून राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना अडीच लाखांची मदत केली. मदतीची ही मूठ तेव्हा झाकलेली होती. शिवाय आपण सदाभाऊंना वडिलांच्या आजारपणासाठी अडीच लाखांची मदत केल्याची बोंब राजू शेट्टींनी ठोकल्याची नोंददेखील कुठे दिसत नाही. मात्र तरीही सदाभाऊंनी राजू शेट्टींना अडीच लाख परत केल्याची
‘बँक पावती’
सोशल मीडियावर प्रसिद्ध करून काय मिळवले ते त्यांचे त्यांनाच माहीत. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन या अडीच लाखांची मागणी सदाभाऊंकडे केली असती तर सदाभाऊंचे वर्तन योग्य ठरले असते. पण अडीच लाखांच्या कर्जमुक्तीचा सोशल तमाशा करून सदाभाऊंनी नात्याचा तुकडा पाडला आहे. सदाभाऊ शेतकऱ्यांचे साधे पुढारी होते. तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण मंत्री होताच ते स्वतःची कर्जमुक्ती करून घेण्याइतपत स्थिरस्थावर झाले, असा अर्थ कर्जग्रस्त शेतकरी बांधव काढू शकतात. सत्तेमुळे शेट्टी व खोत यांच्यात उभी दरी पडली आहे. अशा दऱ्या व तडे पाडणे सत्ताधाऱ्यांच्या सोयीचेच ठरते. खोत आता शेतकरी संघटनेचे राहिलेले नाहीत व फडणवीस सरकारातील एक राज्यमंत्री म्हणून ते रमले आहेत. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश करीत असताना सदाभाऊ हे शेतकऱ्यांच्या संपाविरुद्ध भूमिका घेऊन स्वतःचा पायाच उखडून टाकत होते. खरे म्हणजे त्यांचे असे वागणे सर्व शेतकरी बांधवांना आत्मक्लेश देणारे ठरत होते. सत्तेने एका कार्यकर्त्यास खतम केले, त्यापेक्षा एका मित्रास नष्ट केले. अर्थात हा दोन मित्रांतील वाद वैयक्तिक असला तरी अडीच लाखांच्या कर्जमुक्तीने तो सोशल मीडियाच्या चव्हाटय़ावर आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची
सरसकट कर्जमुक्ती
अद्यापि ‘तत्त्वतः’ आहे आणि सरकारी कागदावरच खेळते आहे. ही कर्जमुक्ती पूर्णपणे तडीस गेलेली नाही. लाखाची मर्यादा दोन लाखांपर्यंत न्यावी ही आमची भूमिका आजही आहे, पण सरकारने दीड लाखावर पूर्णविराम देऊन शेतकऱ्यांचा मोठा वर्ग ‘कर्जग्रस्त’ ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापि संपलेले नाही. सदाभाऊंप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यास दोन-अडीच लाखांच्या कर्जातून मुक्ती मिळावी. निदान दोन लाख तरी हवेच, पण सरकारने दीड लाखाची मर्यादा कर्जमुक्तीसाठी घातल्याने सगळय़ाच शेतकऱ्यांचे जीवन सुधारलेले नाही व शेतकरी आजही दबलेलाच आहे. मंत्री झाल्यापासून राजू शेट्टींच्या अडीच लाखांच्या कर्जाचे ओझे सदाभाऊंच्या छातीवर होते. ते फेडण्यासाठी त्यांना नक्की काय पापड झेलावे लागले हे त्यांनाच माहीत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाही किमान अडीच ते तीन लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळावी ही मागणी स्वतः सदाभाऊंनीच करायला हरकत नाही. कर्जमुक्त झाल्याने नामदार खोत यांना हलके वाटत आहे. राजू शेट्टींच्या कर्जाचे जोखड त्यांनी फेकून दिले आहे. राजू शेट्टींना अचानक धनलाभ झाला. बुडणारे कर्ज वसूल झाले. सदाभाऊंना मोकळे वाटले. त्यांचा स्वाभिमान टिकून राहिला. सोशल मीडियाचे मनोरंजन झाले. शेतकऱ्यांना काय मिळाले?