सदाभाऊ खोत यांची ‘एसके’ शेतकरी संघटना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:06 AM2017-07-21T02:06:49+5:302017-07-21T02:06:49+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर नेते व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उद्या, शुक्रवारी स्वाभिमानी पक्षाने विचारलेल्या २१ प्रश्नांना उत्तर देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर नेते व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उद्या, शुक्रवारी स्वाभिमानी पक्षाने विचारलेल्या २१ प्रश्नांना उत्तर देणार आहेत. त्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी सकाळी दहा वाजता पुण्यात न्यू गेस्ट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांनी जमावे, असे आवाहन केले आहे. त्यांचा स्वाभिमानी किसान शेतकरी (एसके) संघटना काढण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. तसे झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडू शकते.
संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात जाऊनही संघटनेपेक्षा राज्य सरकारची तळी उचलतात या कारणावरून संघटना व सदाभाऊ यांच्यात गेली सहा-सात महिने जोरदार वाद सुरू आहे. त्यातून संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने त्यांना आपले म्हणणे मांडण्याची २१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. ती आज, शुक्रवारी संपत आहे. खोत यांना संघटनेने २१ प्रश्न विचारले आहेत. त्याचे लेखी उत्तर सदाभाऊ सादर करण्याची शक्यता आहे.