साहित्य व सामाजिक क्षेत्रातील 'साधुत्व' हरपलं, अरुण साधूंच्या साहित्यसंपदेवर एक नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 08:10 AM2017-09-25T08:10:25+5:302017-09-25T08:14:44+5:30

शापितसारखी दुष्काळानं देशोधडीला लागलेल्या कुटुंबाची कहाणी असो वा दिवाळी अंकातल्या विविधांगी कथा असोत, साधूंचं लेखण समाजमनावर परिणाम करणारं होतं...

'Sadhusata' Harpal in literature and social sector, 'A Sadhuata' Harpan in the field of literature, and a look at the literature of Arun Sadhu | साहित्य व सामाजिक क्षेत्रातील 'साधुत्व' हरपलं, अरुण साधूंच्या साहित्यसंपदेवर एक नजर

साहित्य व सामाजिक क्षेत्रातील 'साधुत्व' हरपलं, अरुण साधूंच्या साहित्यसंपदेवर एक नजर

Next

मुंबई - मराठी साह‌ित्यक्षेत्रात व‌िशेष कामग‌िरी करणारे आण‌ि महाराष्ट्राच्या सांस्कृत‌िक जीवनावर ठसा उमटव‌िणारे ज्येष्ठ साह‌ित्य‌िक अरुण साधू यांचं वयाच्या 76 व्या वर्षी सायन रुग्णालयात निधन झालं.  मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. 'लिटरेचर इन हरी' समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील लिखाणाबरोबच साधू यांचं इतर लेखनही सातत्यानं सुरू होतं. विविध कथासंग्रहांसह तब्बल 12 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. राजकीय पार्श्वभूमीच्या त्यांच्या कादंबऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. 1972 मध्ये त्यांनी ल‌िहिलेली 'मुंबई द‌िनांक' आण‌ि 1977 मध्ये ल‌िहिलेली 'स‌िंहासन' या दोन कादंबऱ्यांनी मराठी समाज मनावर व‌िशेष प्रभाव टाकला. याबरोबरच 'सत्तांध', 'बह‌िष्कृत', 'व‌िप्लवा', 'मुखवटा', 'त्र‌िशंकू' आदी सामाज‌िक व वैज्ञान‌िक कादंबऱ्यांनीही साह‌ित्य वर्तुळाचे लक्ष वेधले होते.

बहिष्कृत कादंबरी त्यांनी अवघ्या तीन-चार दिवसांत सलग लिहून पूर्ण केली होती. त्रिशंकूही तशाच झपाट्यात लिहिली होती. स्फोटसारखी लोकसंख्येच्या प्रश्नावर लिहिलेली विज्ञान कादंबरी असो वा विप्लवासारखी परग्रहावरील मानवांच्या पृथ्वीच्या दिशेनं आलेल्या अनोख्या प्रवाशांची गोष्ट असो; शापितसारखी दुष्काळानं देशोधडीला लागलेल्या कुटुंबाची कहाणी असो वा दिवाळी अंकातल्या विविधांगी कथा असोत, साधूंचं लेखण समाजमनावर परिणाम करणारं होतं. 

अरूण साधूंनी केलेल्या वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदेला राज्य शासनाचे 'उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती पुरस्कार', 'भैरु रमन दमाणी पुरस्कार', 'न.चि.केळकर पुरस्कार', 'आचार्य अत्रे पुरस्कार' तसेच साहित्यातील व पत्रकारितेतील योगदानासाठी 'फाय फाऊंडेशन' पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. मराठी कथा-कादंबरीला पत्रकार-लेखक सांधूनी आपली स्वंयभू दृष्टी आणि शैली दिली.

'माणूस उडतो त्याची गोष्ट', 'बिनपावसाचा दिवस', 'मुक्ती', 'मंत्रजागर', 'बेचका' ह्या कथासंग्रहातून आणि 'पडघम', 'प्रारंभ', 'बसस्टॉप' आणि इतर एकांकिकेतून त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांना न्याय दिला. 'काकासाहेब गाडगीळ', 'महाराष्ट्र: लँड अँड पिपल' (इंग्रजी), 'अक्षांश-रेखांश', 'निश्चततेच्या अंधारयुगाचा अंत', 'संज्ञापन क्रांती- स्वरूप व परिणाम', 'पत्रकारितेची नीतिमूल्ये' आदी पुस्तकांतून त्यांनी चरित्र-समाजज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान असे विषय हाताळले. 'आणि ड्रॅगन जागा झाला', 'फिडेल-चे आणि क्रांती', 'तिसरी क्रांती', 'ड्रॅगन जागा झाल्यावर' ह्या पठडीत समकालीन देशी विदेशी इतिहासावरही त्यांनी ग्रंथलेखन केले. 'अ सूटेबल बॉय-शुभमंगल' ही त्यांची भाषांतरित कांदबरी  आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज या बृहत् ग्रंथाचा इंग्रजी अनुवादनही त्यांनी केला आहे. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. आंबेडकर या चित्रपटाच्या संहितालेखनातही साधू सहभागी होते.

खुद्द अरुण साधू आपल्या लेखन निर्मिती प्रक्रियेवर भाष्य करताना म्हणतात, 'स्वयंभू व्यक्तींच्या अथवा अखिल समाजाच्या भव्य सर्जनशीलतेमधूनच कलाकार अथवा लेखक निर्मितीच्या प्रेरणा घेतात. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या नकळत आपले अभिव्यक्तीचे माध्यम शोधत असतो. हा शोध आयुष्याच्या अंतापर्यंत चालूच असतो. अरूण साधूंनी अंत:प्रवाही उर्मीतून कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि स्तंभ अशा माध्यमातून केलेले लेखन समकालीन इतिहासाचा मागोवा घेणारे आहे.
 
अरूण साधू यांचा थोडक्यात परिचय -
श्री. अरूण मार्तंडराव साधू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला. प्राथमिक शिक्षण परतवाडा-अचलपूर येथे तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. विदर्भ महाविद्यालय, अमरावतीतून बी.एस.सी. केले. पुणे विद्यापिठातून एम.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ पत्रकारिता केली. 1962 पासून1967 पर्यंत पुण्यात व पुढे 1967 पासून मुंबईत वास्तव्य झाले. केसरी, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, द स्टेट्समन् आदी वर्तमापनत्रांसाठी वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. फ्री-प्रेस जनरलचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. 1989 पर्यंत सक्रीय पत्रकारिता केली. पुढे क्रियाशिलता पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखनाकडे वळले. स्तंभलेखन ते कथाकार - कादंबरीकार-विज्ञानलेखक-इतिहासलेखक म्हणून आजतागायत भरगच्च लेखनकार्य केले आहे.

अरुण साधू यांची साहित्यसंपदा
कादंबर्‍या - झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट
कथासंग्रह - एक माणूस उडतो त्याची गोष्ट,  कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती
नाटक - पडघम
ललित लेखन - अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)
समकालीन इतिहास - ...आणि ड्रॅगन जागा झाला, ...जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती
शैक्षणिक - संज्ञापना क्रांती
एकांकिका - प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
इंग्रजी - The Pioneer (चरित्र)

Web Title: 'Sadhusata' Harpal in literature and social sector, 'A Sadhuata' Harpan in the field of literature, and a look at the literature of Arun Sadhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.