मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर
By admin | Published: April 25, 2017 11:12 AM2017-04-25T11:12:19+5:302017-04-25T11:37:49+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच लाखांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. एप्रिल २०१६ मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला. त्यानंतर साध्वीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र विशेष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज सुनावणी झाली असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
बॉम्बस्फोटात वापरलेली मोटारसायकल आपली असली तरी ती दुसऱ्याला विकण्यात आल्याचा दावा साध्वीने उच्च न्यायालयात केला होता. साध्वी आजारी असल्याने तिचा जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती साध्वीच्या वकिलांनी न्यायालायाला केली होती. साध्वीच्या जामीन अर्जावर एनआयएनेही आक्षेप घेतलेला नव्हता. ‘साध्वीविरुद्ध पुरावे नसल्याने व काही आरोपींनी त्यांचा जबाब फिरवल्याने तिच्याविरुद्ध परिावे नाहीत,’ असा युक्तिवाद एनआयने खंडपीठापुढे केला होता.
साध्वीपाठोपाठ लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनेही उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. युएपीएची सुधारित तरतूद पूर्वलक्षित प्रभावाने लागू केली जाऊ शकत नाही. तसेच या तरतुदीनुसार युएपीए लागू करण्यासाठी विशेष समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी २००९ मध्येही समितीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सुधारित तरतुदींनुसार पुरोहितला जामीन नाकारणे बेकायदा आहे, असे पुोहितने याचिकेत म्हटले होते. पुरोहितच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना जामीन दिला असला तरी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.