साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 02:17 AM2017-04-26T02:17:21+5:302017-04-26T02:17:21+5:30
सन २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञा सिंह चंद्रपाल सिंह ठाकूर उर्फ साध्वी हिला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.
मुंबई : सन २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञा सिंह चंद्रपाल सिंह ठाकूर उर्फ साध्वी हिला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मात्र, याच खटल्यातील आणखी एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी, गेली सुमारे नऊ वर्षे तुरुंगात असलेली साध्वी आता बाहेर येईल, पण पुरोहितला मात्र कारागृहातच राहावे लागेल.
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वीचा जामीन अर्ज गेल्या वर्षी २८ जून रोजी, तर पुरोहितचा जामीनअर्ज २९ सप्टेंबर रोजी फेटाळला होता. याविरुद्ध या दोघांनी केलेल्या अपिलांवर फेब्रुवारीत राखून ठेवलेले निकाल न्या. रणजीत मोरे व न्या. डॉ. शालिनी फणसाळखर-जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी जाहीर केले.
आधी एटीएस व नंतर एनआयएने सादर केलेल्या तपास अहवालांचा एकत्रितपणे विचार केला तरी साध्वीवर केले गेलेले आरोप खरे मानण्यास प्रथमदर्शनी काही आधार दिसत नाही, असा निष्कर्ष खंडपीठाने ७८ पानी निकालपत्राच्या अखेरीस नोंदविला. शिवाय साध्वी एक महिला आहे. ती २३ आॅक्टोबर २००८ पासून तुरुंगात आहे. तिला स्तनाचा कर्करोग झाला असून सध्या तिची तब्येत नाजूक असून तिला आधार घेतल्याशिवाय चालताही येत नाही, याचीही न्यायालयाने नोंद घेतली.
या उलट पुरोहित याच्याविरुद्धचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत व सकृद्दर्शनी तरी त्यात तथ्य असल्याचे दिसते. त्यामुळे बेकायदा प्रतिबंधक कायद्याच्या कडक बंधनानुसार त्यास जामीन दिला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले. पुरोहित गेली नऊ वर्षे तुरुंगात आहे, हा जामिनासाठी आधार होऊ शकत नाही.कारण त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्यास त्याच जन्मठेप किंवा फाशीही दिली जाऊ शकते.
शिवाय विशेष न्यायालायपुढे खटल्याची रीतसर सुनावणीही आता लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे गुन्ह्यांसाठी जेवढी शिक्षा
होऊ शकते तेवढा किंवा त्यापैकी बहुतांश काळ कच्चा कैदी म्हणून तुरुंगात राहावे लागणे हा निकष त्याच्या प्रकरणास लागू होत
नाही, असेही न्यायमूर्तींनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)
नातेवाईकाने चॉकलेट वाटले
साध्वीविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नसताना, नाहक तिला नऊ वर्षे कारागृहात काढावी लागली. अखेर आम्हाला नऊ वर्षांनी न्याय मिळाला. आम्ही हा साजरा करू, अशी प्रतिक्रिया साध्वीचे मेव्हणे भगवान झा यांनी पत्रकारांना दिली. त्यानंतर, त्यांनी चक्क न्यायालयाच्या आवाराबाहेर पत्रकारांसह येणाऱ्या-जाणाऱ्यांना चॉकलेट वाटले.
साध्वीला पाच लाख रुपयांचा जामीन देणे लगेच शक्य नसल्याने, तिने तूर्तास तेवढ्या रकमेचा व्यक्तिगत जातमुचलका द्यावा व महिनाभरात पाच लाखांचा रीतसर जामीन द्यावा, अशी मुभाही न्यायालयाने दिली. मात्र, पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करणे, एनआयए बोलावेल तेव्हा हजर राहणे, तपासात ढवळाढवळ किंवा साक्षीदारांवर दबाव न टाकणे आणि खटल्यासाठी विशेष न्यायालयात उपस्थित राहणे या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला.
विशेष म्हणजे, या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या एका व्यक्तीचा मुलगा निस्सार अहमद हाजी सैदय बिलाल यांनी या दोन्ही प्रकरणांत न्यायालयाच्या अनुमतीने हस्तक्षेप करून, दोघांनाही जामिनावर सोडण्यास कसून विरोध केला.