वसंतराव डावखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 12:18 AM2018-01-05T00:18:11+5:302018-01-05T00:21:49+5:30
मुंबई- विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मुंबई- विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी बॉम्बे रुग्णालयात जाऊन डावखरे यांचं अंत्यदर्शन घेतलं.
Saddened to know about the demise of Former Deputy Chairman of Maharashtra Legislative Council Shri Vasant Davkhare ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 4, 2018
My deepest condolences to his family, friends and followers.
सलग 18 वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. डावखरे यांचे कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणापलीकडची मैत्रीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेत राहिली. गेल्या दोन महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ठाण्यातील हरी निवास येथील गिरीराज हाइट्समध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.