सदोष मनुष्यवधाची शिक्षा रद्द
By admin | Published: July 19, 2015 02:05 AM2015-07-19T02:05:09+5:302015-07-19T02:05:09+5:30
कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने
मुंबई : कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने अपीलात रद्द केली. ही याचिका प्रलंबित असताना आरोपींचा मृत्यू झाला. मात्र आरोपींनी पीडितांना जीवे मारण्याच्या हेतूनेच विषारी दारू विकली होती हे सिद्ध झालेले नाही, असेही न्या. अभय ठिपसे यांनी सात पानी निकालपत्रात नमूद केले आहे.
शेवंताबाई राऊत व जयपाल माने अशी या आरोपींची नावे आहेत. २०-२३ मे १९८९ या काळात त्यांच्याकडील दारू पिऊन १३ जणांचा बळी गेला. या प्रकरणी पाच जणांवर सदोष मनुष्यवधासह इतर आरोप ठेवण्यात ठेवले. कोल्हापूर सत्र न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी १० वर्षांची शिक्षा ठोठावली. याविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी शिक्षा ठोठावताना आरोपीचा हेतू हत्या करण्याचाच होता हेही सिद्ध होणे आवश्यक आहे. हे या प्रकरणात सिद्ध झालेले नाही. तेव्हा आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी ठोठावलेली शिक्षा रद्द केली जात आहे. ही शिक्षा ठोठावताना आरोपींना काही दंड ठोठावला असल्यास तो त्यांच्या नातलगांना परत करावा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.