सफाई कामगार धडकले पालिकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 02:48 AM2016-08-04T02:48:15+5:302016-08-04T02:48:15+5:30
महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांचा जाहीर निषेध करत थकीत वेतन द्या, कायदेशीर पीएफ, ईएसआयसी व अन्य सुविधा द्या, दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा
ठाणे : महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांचा जाहीर निषेध करत थकीत वेतन द्या, कायदेशीर पीएफ, ईएसआयसी व अन्य सुविधा द्या, दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या मागण्यांसाठी मलनि:सारण व अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पालिकेने या कामगारांच्या सर्वच मागण्या मान्य केल्याने तूर्तास एक महिन्यापर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मलनि:सारण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सहा महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आले नसल्याने या कर्मचाऱ्यांना घरे चालवताना अडथळे निर्माण होत आहेत. घंटागाडीच्या नवीन ठेकेदाराने जुन्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घेण्याचे कबूल करूनही त्यांना डावलले आहे. कंत्राटदाराने कायदेशीर वेतन व अन्य देय रकमा आणि कायदेशीर सुविधा वेळेत न पुरवल्यास मूळ मालक म्हणून प्रशासनाने कामगारांना ही रक्कम व सुविधा अदा करून ती रक्कम कंत्राटदाराच्या देय रकमेतून कापून घेण्याची कायदेशीर तरतूद आहे. परंतु, विविध विभागांतील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
या कामगारांना न्याय मिळावा म्हणून बुधवारी श्रमिक जनता संघाने धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कायदेशीररीत्या या कामगारांना वेतन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी मान्य केले. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही पावले उचलली जातील. ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. ज्या कामगारांना सामावून घेतलेले नाही, त्यांना ठेकेदारांनी सामावून घ्यावे आदींसह इतर मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. (प्रतिनिधी)