जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Published: May 18, 2016 02:50 AM2016-05-18T02:50:05+5:302016-05-18T02:50:05+5:30

पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता.

The safety of the tourists in Janjira is on the anvil | जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

Next


मुरुड-जंजिरा : पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता. सध्या सुटी असल्याचे मुरुड-जंजिऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र अजूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. त्यांना नियंत्रित करताना बोटमालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. दुसरीकडे काशीद समुद्रकिनारी खोल पाण्यात ओढले गेलेल्या पर्यटकांना सोमवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात आले. त्यामुळे प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची मुरु ड-जंजिराच्या पर्यटनस्थळी विशेषत: जंजिरा किल्ला पाहायला गर्दी होत आहे. गेल्या काही पावसाच्या संकेतामुळे समुद्रही खवळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याजवळ उतरणे म्हणजे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. शिडाची बोट एकाच वेळी सात-आठ फूट उंच झेपावते तर क्षणार्धात तेवढ्याच वेगाने खाली येते. अशा वेळी होडीतील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना बकोट धरून अवजड सामानाप्रमाणे धरपकड करीत उतरवले जाते. यात महिला पर्यटकांवर अधिक नामुष्की येते. भयानक लाटांच्या तडाख्यांत पर्यटक उतरण्याचा प्रयत्न करताना बोट गडाच्या तटबंदीवर आदळते, तर कधी खडकाळ पायरीवर आदळते. अनेकदा पर्यटक पाण्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. या परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
एकावेळी शेकडो पर्यटक किल्ल्याच्या सगळ्या पायरीवर गर्दी करीत असल्याने महिला, लहानगी मुले व ज्येष्ठांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारत येत नाही. वर्षोनुवर्षे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या ठिकाणी चिंचवडमधून आलेल्या अजय कुलकर्णी या पर्यटकाने मांडले.
मुंबईहून आलेले मनजित सिंग यांनी लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. मात्र प्रशासनाकडून सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना दिल्या जात नसल्याने जीवाचा धोका उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरामध्ये लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यांची सुरक्षा प्रशासनाकडून राखली जात नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालये बांधून अनेक वर्षे झाली, पण ही शौचालये सुरूच करण्यात आलेली नाहीत.
मुरु ड-जंजिरा समुद्रकिनारा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित किनारा आहे. पण काशीद समुद्रकिनारा निसर्गत: खोलगट आहे. दरवर्षी ओहोटीच्यावेळी पर्यटक समुद्रामध्ये खेचले गेल्याचे अनेक प्रसंग घडतात. सोमवारी अशाच प्रसंगामध्ये ग्रामस्थांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.

Web Title: The safety of the tourists in Janjira is on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.