महापालिकेवर भगवा फडकल्याची 24 फेब्रुवारीच्या सकाळची हेडींग असेल - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2017 08:58 PM2017-02-04T20:58:37+5:302017-02-04T21:20:14+5:30
शिवसेनेच्या विरोधात बोलणारा संपतो. मुंबईकर त्याला संपवतात हा इतिहास आहे. शिवसेना दिसणार नाही म्हणणारे आज नाहीत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - शिवसेनेच्या विरोधात बोलणारा संपतो. मुंबईकर त्याला संपवतात हा इतिहास आहे. शिवसेना दिसणार नाही म्हणणारे आज नाहीत. शिवसेना तिथेच आहे, जो शिवसेनेला आव्हान देतो तो राजकारणात दिसत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्हाला हा अनुभव येईल अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
गिरगाव चिराबाजार येथे सभा आयोजित करुन शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. 24 फेब्रुवारीला सकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याची हेडींग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पारदर्शी कारभारावरुन शिवसेनेवर बोट ठेवणा-या भाजपाने स्वत:च्या हाताने स्वत:चे दात घशात घातले. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अहवाल मुंबई मनपाचा कारभार देशात सर्वाधिक पारदर्शी असल्याचे सांगतो असे उद्धव म्हणाले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हा मैत्रीपूर्ण सामना असल्याचे सांगत आहेत पण हा मैत्रीपूर्ण सामना नाही. तुम्ही तुमच्या पाठिशी उभा राहणारा मित्र गमावला आहात असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत शिवसेनेने विकास काम केल्याची जी होर्डींग लावली आहेत त्यातला एक तरी मुद्दा खोडून दाखवा, मी तुम्हाला आव्हान देतो असे उद्धव म्हणाले.
युतीच्या जोखडातून बाहेर पडलो, यापुढे युती करणार नाही. शिवसेना स्वबळावर सत्ता आणेल. जो पराक्रम दाखवायचायं तो शिवसैनिक दाखतील असे सांगून त्यांनी यापुढे युतीचे राजकारण करणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचा व्देष भाजपाच्या नसानसात भिनलाय. भाजपावाले शिवसेनेबरोबर आमचे मनभेद नसून मतभेद असल्याचे सांगत आहेत.
हो आहेत आमचे मतभेद. हिंदुत्व सोडत असाल, नवाज शरीफच्या जवळ जात असाल, गरीब शेतक-यांची जमीन काढून उद्योगपतींना देणार असाल तर हो आमचे मतभेद आहेत असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
अमित शहा हा मैत्रीपूर्ण सामना नाही, तुम्ही तुमच्या पाठिशी उभा राहणारा मित्र गमावला आहात.
कर्तव्याला चुकू नका, घराघरात जाऊन शिवसेनेचा वचननामा पोहोचवा.
युतीच्या जोखडातून बाहेर पडलो, यापुढे युती करणार नाही, जो पराक्रम दाखवायचायं तो शिवसैनिक दाखतील.
शिवरायांचा पवित्र भगवा पुन्हा महापालिकेवर भगवा फडकवा, भगवा स्वच्छ हवा, त्यावर दुसरा कुठला डाग नको.
शिवसेनेच्या विरोधात बोलणारा संपतो, मुंबईकर संपवतात.
बोबडे आरोप काय करता ? किरीट सोमय्यांना नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला.
कंत्राट निघालेलं नसताना शिवस्मारकाचे भूमिपूजन केले, इंदू मिलमध्ये होणा-या आंबेडकर स्मारकाची वीटही अद्याप रचलेली नाही.
शिवसेनेचा व्देष भाजपाच्या नसानसात भिनलाय.
पावसाळयात मुंबईत पाणी तुंबु दिल नाही.
मुंबई तोडण्याचा डाव रचणा-याला तोडून टाकू.
श्रीपाल सबनीस यांच उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन.
उत्तरप्रदेशात निवडून आल्यावर पीक कर्ज माफ करणार असाल तर, महाराष्ट्रातही शेतक-यांच पीक कर्ज माफ करा.
नोटाबंदीमुळे शेतक-याचं पीकर्ज माफ करा ही शिवसेनेने मागणी केली होती.
बँकांच्या रांगेमध्ये शेठ माणूस उभा राहिला नाही, गरीब माणूस मेला.
नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी वाट लावली, लग्नकार्य रद्द झाली, लोकांचे हाल झाले.
भाजपा आंतरराष्ट्रीय पक्ष, मंगळावर भाजपाचे पाच लाख सदस्य असू शकतात.
जनतेकडून सूचना मागवून वचननामा बनवता म्हणजे तुम्हाला अजून मुंबई कळलेली नाही.
मुंबई महापालिकाच मुंबईत कोस्टल रोड साकारणार.
मुंबईत शिवसेनेने विकास काम केल्याची जी होर्डींग लावली आहेत त्यातला एक तरी मुद्दा खोडून दाखवा, मी आव्हान देतो.
महाभारत असेल तर, श्रीखंडी-पाखंडी कोण ते ठरवा.
केंद्राच्या अहवालानंतर बोबडया लोकांची बोबडी वळली.
देशाला खड्डयात घातले, प्रचारात मुद्दे नाहीत.
शिवसेना संपणार नाही, शिवसेनेला संपवणारे संपले.
तिस-या इयत्तेतल्या मुलीच्या दप्तरामंमध्ये पिस्तुल कसे आले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
आम्ही शाळेतल्या मुलांच्या पाठिवरच ओझ कमी केले त्यांना टॅब दिला हे मी अभिमानाने सांगतो.
24 फेब्रुवारी रोजी सकाळी वृत्तपत्रामध्ये मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला हा मथळा असेल.