मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी टपाल तिकिटावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:56 AM2021-08-28T09:56:15+5:302021-08-28T09:56:35+5:30
द्राक्ष, डाळिंबेही येणार; टपाल खात्याकडून ‘जीआय’ उत्पादनांची प्रसिद्धी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी यांंना भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे. यासोबतच उत्पादक ते ग्राहक यांच्यात या मालाच्या वाहतुकीची जबाबदारीही टपाल खात्याने घेतली आहे.केंद्र सरकार, टपाल खाते व राज्य कृषी विभाग यांच्यातील समन्वयातून हे साध्य झाले आहे. आंबा, ज्वारीपाठोपाठ नाशिकची द्राक्षे, पुरंदरचे अंजिर, नागपूरची संत्री यांनाही लवकरच टपाल खात्याच्या पाकिटावर स्थान मिळणार आहे. फक्त शेतमालच नव्हे तर सोलापूरची चादर आणि
टॉवेल यांनीही टपाल खात्याला आकर्षित केले असून तेही पाकिटावर झळकले आहेत.
या सर्व उत्पादनांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे त्यांना भौगोलिक चिन्हांकन-जीआय मिळाले आहे. केंद्र सरकारच्या एका संस्थेकडून उत्पादनाचा दर्जा, उपयोगिता, एकसारखेपणा असे अनेक निकष लावून हे चिन्हांकन दिले जाते. राज्याच्या कृषी व निर्यात विभागाने गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या प्रयत्नातून राज्यातील २८ उत्पादनांना असे चिन्हांकन मिळाले आहे.
गुणवत्ता असूनही या उत्पादनांना अपेक्षित प्रसिद्धी मिळत नव्हती. खासगी कुरियर कंपन्यांच्या स्पर्धेत काहीसे मागे पडलेल्या टपाल खात्याचा यात उपयोग होईल ही कल्पना पुढे आली. अल्पावधीतच ती अमलातही आली. महत्त्वाच्या घटनांचे स्मरण राहण्यासाठी टपाल खात्यातर्फे विशेष तिकिटे, पाकिटे प्रसिद्ध करण्यात येतात. त्याचा वापर या उत्पादनांसाठी करून घेण्यात आला आहे.
भौगोलिक मानांकन
n जीआय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. भौगोलिक चिन्हांकन. हे वैयक्तिक दिले जात नाही.
n एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्तजण एकाच दर्जाचा माल उत्पादित करत असतील तर त्या समुहाच्या मालाचा इतिहास, दर्जा, ऊपयोगिता, एकसारखे गूण तपासून जीआय टँग देतात.
n त्यामुळे त्या मालाला प्रतिष्ठा मिळते व त्याचा ऊत्पादकाला फायदा मिळतो.
औरंगाबाद विभागात सुरूवात
n औरंगाबाद टपाल विभागाने नुकतीच मराठवाडा केशरची तिकिटे आणि पाकिटेही प्रसिद्ध केली.
n सोलापूर टपाल विभागाने तर एकाच वेळी सोलापूरची चादर, टॉवेल, मंगळवेढ्याची ज्वारी अशा तीन उत्पादनांची तिकिटे व पाकिटे समारंभपूर्वक प्रकाशित केली.
n केंद्रीय टपाल खात्याने आपल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रातील ‘जीआय’ उत्पादनाची अशी तिकिटे व पाकिटे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे स्थानिक वैशिष्ट्ये टपाल तिकिटे व पाकिटांवर दिसतील.