सागर बिल्डर्सला १० हजारांचा दंड
By admin | Published: June 13, 2016 03:57 AM2016-06-13T03:57:40+5:302016-06-13T03:57:40+5:30
सोसायटीला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या सागर बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे
ठाणे : करारनाम्याप्रमाणे सोसायटीला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या सागर बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे. सागर बिल्डर्सने मीरा-भार्इंदर येथील ४६५९० चौरस मीटर भूखंडावर इमारत क्रमांक ४० ते ५७ बांधून प्रकल्प विकसित केला. त्यातील सदनिकांची विक्री केली. मात्र, बिल्डरने सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन न केल्याने दोन इमारतींमधील सदनिकाधारक आणि दुकान गाळेधारकांनी एकत्र येऊन गोकूळगाव को-आॅप. हाऊसिंग सोसायटी स्थापन केली. त्यानंतर, त्यांनी सोसायटीच्या नावे इमारत आणि भूखंडांचे हस्तांतरणपत्र करून देण्याची मागणी केली. मात्र, बिल्डरने याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने सागर बिल्डर्सच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.
४६,५९० चौरस मीटर क्षेत्रफळाचे हस्तांतरणपत्र दोन इमारती असलेल्या गोकूळगाव सोसायटीच्या नावे दिल्यास इतरांवर अन्याय होईल. त्यामुळे सर्व्हेअर एम.बी. राणे यांनी सोसायटीत येत असलेल्या भूखंडाची मोजणी करून सादर केलेल्या ड्राइंगनुसार भूखंडाचे हस्तांतरणपत्र द्यावे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे सर्व्हे नं. २२२ (पी) आणि २२३ (पी) मधील अनुक्रमे १३६२ आणि १२०२ चौरस मीटर भूखंडांचे इमारतींसह हस्तांतरणपत्र सोसायटीला द्यावे.
>कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता सागर बिल्डर्स यांनी दुसऱ्या डेव्हलपर्सकडून ४६,५९० चौरस मीटर क्षेत्रफळापैकी २,०६,८२१ चौरस फूट चटई निर्देशांक वापरण्यासाठी हक्क विकत घेतले. त्यानंतर, दोन इमारती ए ते डी विंगसह विकसित केल्या.