‘सागर’ वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:17 AM2018-05-20T01:17:16+5:302018-05-20T01:17:16+5:30
उष्णतेच्या लाटेचा मात्र कहर : मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा
मुंबई : अरबी समुद्रात उठलेले ‘सागर’ नावाचे वादळ सोमालियाचा समुद्र पार करत, पश्चिम-दक्षिणेला सरकले आहे. परिणामी, मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाला या वादळाचा धोका नाही, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धिंगाणा घातला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात उठलेले ‘सागर’ वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेला सरकले. देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून हे वादळ दूर असल्याने त्याचा देशाला धोका नाही.
हे वादळ पुढे सरकत आता ते सोमालियाकडे सरसावले. वादळाचा परिणाम म्हणून यमन, सोमालिया आणि सौदी अरेबियाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वादळाच्या दिशेत बदल होत असतानाच, राज्यात वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत.
मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे.
कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
२० ते २३ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२० ते २१ दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
२२ ते २३ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
रविवारसह सोमवारी मुंबईमधील आकाश निरभ्र राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यात २०१ जणांना उष्माघाताचा त्रास
मुंबई : आठ दिवसांपूर्वी राज्यातील उष्माघातावर उपचार घेणाºयांची संख्या १४९ असताना आरोग्यभवनाकडून नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध रुग्णालयात २०१ जण उष्माघातावर उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अमरावती येथे उष्माघाताने एकाचा बळी गेला आहे.
गेल्या वर्षी उष्माघाताने १३ जणांचा बळी गेला होता. उष्माघातावर उपचार घेणाºयांमध्ये नागपूरची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या १२९ इतकी आहे, अशी माहिती राज्य आरोग्य संचालनालयाकडून मिळाली. दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्माघाताचा प्रभाव सर्वाधिक आहे. नागपूर महापालिका क्षेत्राखालोखाल यवतमाळ क्षेत्रात २८, नागपूर जिल्हा २१, बुलढाणा क्षेत्रात १४ असे रुग्ण उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल आहेत.