भातशेतीसाठी सगुणा तंत्र फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:44 AM2018-10-09T11:44:32+5:302018-10-09T11:44:48+5:30

ग्रासरुट इनोव्हेटर : काशीनाथ खोले नेरळ येथील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्या सहवासात आले आणि त्यांच्याकडून त्यांनी सगुणा शेतीचे धडे मिळविले.

Saguna techniques for rice cultivation are beneficial | भातशेतीसाठी सगुणा तंत्र फायदेशीर

भातशेतीसाठी सगुणा तंत्र फायदेशीर

googlenewsNext

- हेमंत आवारी (अकोले, जि.अहमदनगर)

सहा वर्षांपासून  शेताची नांगरणी, वखरणी नाही. रोप नाही. पहिला पाऊस पडला की, खाचरात गादी वाफ्यावर भाताचे बी एका ओळीत टोबायचे. पावसाच्या पाण्यावर नैसर्गिक सेंद्रिय शेती पिकवायची अन् उत्पादन खर्च कमी करून पारंपरिक भातशेतीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घ्यायचे, ही किमया ‘सगुणा’ तंत्रामुळे साधली. पेंडशेत शिवारात काशीनाथ खोले या आदिवासी शेतकऱ्याने सगुणा पद्धतीने भातशेती फुलविली आहे. काशीनाथ खोले नेरळ येथील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्या सहवासात आले आणि त्यांच्याकडून त्यांनी सगुणा शेतीचे धडे मिळविले. २०१३ ला त्यांनी सगुणाची कास धरली.

पूर्वी रानात दोन अडीच पोती पेरली की दहा बारा पोते उत्पादन मिळायचे. आता सगुणामुळे नांगरणी बंद झाल्याने बैलं विकून टाकले. गाळ करण्याचा प्रश्न राहिला नाही. गादी वाफे करायचे. त्यावर टोभणी यंत्राने शिस्तबद्ध भात टोभायचे. एकरी १० ते १२ किलोत लागवड पूर्ण होते. दोन ओळीत अंतर असल्याने शेतात मोकळे वावरता येते. लावणीचा मजुरी खर्च कमी झाला. तण काढून गाडल्याने सेंद्रिय खत मिळते. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते. ‘शेण, गोमूत्र, दही, गूळ, डाळीचे पीठ’यापासून तयार केलेले ‘जिवामृत’ फवारले की कीड नियंत्रण होते. पाणी कमी लागते. रबीत टोभूनच हरभरा, वाटाणे, मसूर पीक घेता येते. भाताची खोड तशीच असली तरी ती सडतात आणि खत मिळते.

सहा एकरवर सगुणाबाग उभारली असून, सध्या पारंपरिक वाण काळभात, जीरवेल, कोळपी तसेच इंद्रायणी, फुलेराधा वाण उभे आहेत. एकरी २२ ते २४ क्ंिवटल भात उत्पादन होते. हातसडीचा काळभात १२५ रुपये तर इंद्रायणी ६० रुपये किलोने विकला. २५ गुंठ्यात दीड क्ंिवटल हरभरा, वाटाणा व मसूर प्रत्येकी ५० किलो उत्पादन मिळाले. आपली ही शेती बघून तालुक्यातील इतर गावातील ७५ शेतकरी सगुणा शेतीकडे वळाले, असे खोले सांगतात.

Web Title: Saguna techniques for rice cultivation are beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.