पोलिसांसाठी सह््यांची मोहीम
By admin | Published: September 19, 2016 01:25 AM2016-09-19T01:25:19+5:302016-09-19T01:25:19+5:30
सतत कर्तव्यावर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी २० सप्टेंबरपासून सह्यांची मोहीम पिंपरी-चिंचवडमध्ये राबविली जाणार आहे
वाकड : पोलिसांवरील वाढते हल्ले, कामाचा ताण, बंदोबस्त, तपास यामुळे सतत कर्तव्यावर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी २० सप्टेंबरपासून सह्यांची मोहीम पिंपरी-चिंचवडमध्ये राबविली जाणार आहे, अशी माहिती स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष हेमंत चव्हाण आणि स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष रोहित मोहिते यांनी दिली.
शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविता येतात.मात्र, समाजाच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी असलेल्या पोलिसांना संघटन बांधणीची परवानगी नाही. त्यामुळे पोलिसांना समस्यांना सामोरे जावे लागते.त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर व कुटुंबीयांवर पडल्याचे दिसून येते.कर्नाटक, पंजाबमध्ये पोलिसांच्या संघटना आहेत.त्याचप्रमाणे राज्य पोलिसांना संघटन बांधणीची परवानगी दिली पाहिजे.याच मागणीसाठी आग्रही असलेले स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी २५ जुलै २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. परंतु यावर कार्यवाही न झाल्याने आमदार राणे यांच्या आदेशानुसार मोहीम सुरु करणार आहे.(वार्ताहर)