सहारा गुंतवणूकदारांनीच पैशासाठी कोर्टात जावे!
By admin | Published: June 1, 2016 04:22 AM2016-06-01T04:22:59+5:302016-06-01T04:22:59+5:30
‘गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल, तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविले जावेत, यासाठी न्यायालयात जावे, असे मी सुचवू इच्छितो
सोपान पांढरीपांडे, नागपूर
‘गुंतवणूकदारांना रक्कम परत हवी असेल, तर त्यांनी माझ्या संपत्तीच्या विक्रीवरील प्रतिबंध हटविले जावेत, यासाठी न्यायालयात जावे, असे मी सुचवू इच्छितो,’ असे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी ‘लोकमतशी’ बोलताना स्पष्ट केले.
जवळपास ३ कोटी गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी रुपये परत देण्यात असमर्थ ठरल्याच्या कारणावरून रॉय मार्च २०१४ पासून कारागृहात आहेत. आईच्या अंत्यविधीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ७ मेपासून चार आठवड्यासाठी पॅरोलवर सोडले आहे. क्रियाकर्म उरकल्यावर रॉय सध्या कठीण समयी सोबत असलेल्या गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी देशभरात ‘आभार यात्रा’ करीत आहेत. या यात्रेत रॉय चार्टर्ड विमानाने नागपुरात आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
लोकमत : सर्वोच्च न्यायालयाने २४ हजार कोटी परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम उभारण्याची तुमची योजना काय?
रॉय : हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर काहीही बोलू इच्छित नाही.
लोकमत : पॅरोलमध्ये वाढ न झाल्यास तुम्ही जेलमध्ये परताल. अशा स्थितीत गुंतवणूकदारांचे भविष्य काय?
रॉय : गेल्या २६ महिन्यांपासून मी कारागृहात आहेत. देशभरातील माझ्या संपत्तीच्या विक्रीवर न्यायालयाने प्रतिबंध लावले आहेत. रक्कम परत करण्याची माझी इच्छा आहे. प्रतिबंध दूर झाल्यास मला संपत्ती विकता येईल. जर गुंतवणूकदारांना परतावा हवा असेल, तर त्यांनी न्यायालयात जाऊन माझ्यावर असलेले प्रतिबंध हटवावेत.
लोकमत : परतावा देण्याची तुमची जबाबदारी आहे. गुंतवणूकदारांनी न्यायालयात का जावे?
रॉय : तिढा सुटण्याचा हा एक मार्ग आहे. प्रतिबंध दूर झाल्यास सध्या बंद असलेले व्यावसायिक उपक्रम सुरू होतील.
लोकमत : जामिनासाठी न्यायालयाने तुम्हाला ५ हजार कोटी रोख आणि तेवढ्याच रकमेची बँक हमी भरण्यास सांगितले होते, पण तुम्ही भरू शकला नाहीत. त्याचे काय?
रॉय : तुमच्याशी बोलताना आनंद होत आहे, पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी हे केले नाही. कृपया मला क्षमा करा.
(या वेळी कारच्या सभोवताली असलेल्या बाउन्सर्सनी चालकाला कार पुढे नेण्यास सांगितले आणि संवाद इथेच संपला.)