सहेला रे...

By admin | Published: April 4, 2017 08:25 AM2017-04-04T08:25:40+5:302017-04-04T08:25:40+5:30

गोष्ट तशी फार वर्षांपूर्वीची. एका रंगमंदिरातली. श्रोत्यांनी खच्चून भरलेलं सभागृह. एक-न्-एक खुर्ची रसिकांनी व्यापलेली. पण व्यासपीठ रिकामं.

Sahela Re ... | सहेला रे...

सहेला रे...

Next

 ऑनलाइन लोकमत

- चंद्रशेखर कुलकर्णी
 
गोष्ट तशी फार वर्षांपूर्वीची. एका रंगमंदिरातली. श्रोत्यांनी खच्चून भरलेलं सभागृह. एक-न्-एक खुर्ची रसिकांनी व्यापलेली. पण व्यासपीठ रिकामं. कलावंताची जीवघेणी प्रतीक्षा. वेळ टळून गेली तरी कलावंताचा पत्ता नव्हता. श्रोत्यांची अस्वस्थता, चिडचिड जाणवत होती. क्षणागणित तणाव वाढत होता. पण कुणीही उठून गेलं नव्हतं. अखेर एकदाची ही जीवघेणी प्रतीक्षा संपली.  ती गायिका रंगमंचावर आली. तंबो-याची गवसणी निघाली. साजिंदांच्या हत्यारांची जुळवाजुळव झाली. तानपुरा लावता लावता या गायिकेनं तबलजीच्या दिशेनं मधूनच नापसंतीचे कटाक्षही टाकले. रंगमंचावर येताना चप्पल काढून याचं भान त्याला राहिलं नाही, याबद्दल त्याच्या वाट्याला चार बोलही आले. गायिकेनं षड्ज लावल्यावर त्याआधीची चिडचिड, त्रास, प्रतीक्षेचा ताण सारं सारं भूतकाळात गडप झालं.
 
खरं तर त्या  रंगगृहाचं गर्भगृह कधी  झालं हे कळलंच नाही. रंगमंदिर भारुन टाकणारा तो सूर सच्चा होता. सर्वार्थानं सात्विकही. कधी तो लखलखत्या झुंबरासारखा भासला तर कधी देव्हा-यातल्या सांजवातीसारखा स्निग्ध अन् प्रसन्न. कधी सोनचाफ्यासारखा दरवळला तर कधी पारिजातकासारखा अलगद टपटपला. कधी चैत्रातल्या उन्हासारखा स्वच्छंदपणे उब देत अंगाखांद्यावर बागडला. कधी श्रावणासरींसारखा झिमझिमला. कधी पौषातल्या गारव्यासारखा झोंबला. बघता बघता त्या सच्च्या विशुद्ध सुरांपुढे लौकिक जग मिथ्या वाटून लागलं. सारं काही निरर्थक ठरलं. मुख्य म्हणजे कानांत प्राण ओतून हे अद्भुत सूर मनात साठवू  पाहणा-यांना अभिजात संगीताचा अर्थ उमगला. जोडीनं भारतीय तत्त्वज्ञानाचं सारही उलगडलं.
 
कविवर्य बा.भ.बोरकरांच्या भाषेत सांगायचं तर, "मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो... जीवन त्यांना कळले हो..."
यासारखं मी-माझं, तू-तूझं असा अंहचा अंगरखा उतरवणा-या अनुभूतीचा साक्षात्कार झाला. वेदान्ताचं सार सुरांतून उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य लाभलेली ही बहुधा एकमेव गायिका. म्हणूनच साक्षात सरस्वती. उभ्या भारतवर्षासाठी गानसरस्वती.....
हा असा प्रसंग अनेकदा घडला. स्थल-काल बदललं. पण अनुभूती अगदी तशीच. बावनकशी. शंभर नंबरी. म्हणून तर या गानसरस्वतीच्या मूडीपणाची, लहरींची चर्चा झाली. कुजबूजही झाली. पण आविष्काराच्या पारलैौकिकत्वाच्या जातकुळीबद्दल बोलायला कुणी कधीच धजावलं नाही. बड्या कलावंतांना गायकांना आकर्षण वाटावं, प्रसंगी हेवा वाटावा असं हे गाणं. सर्वस्वी अलौकिक. 
मग त्या असं का वागतात, हे कोडं खरंतर एव्हाना अनेकांना उलगडलं आहे. परिपूर्णतेचा ध्यास किंबहुना सुरांवरची श्रद्धा आणि निष्ठा हा या मनस्वी लहरीपणाचा पाया आहे. आस्तिक माणसाची देवावरची श्रद्धा अन् या गायिकेची सुरांवरची श्रद्धा यांचा पोत वेगळा नाही. अशी श्रद्धा अनेकांची आहे आणि असेलही. पण सच्च्या, निर्भेळ सुरांवरची ही श्रद्धा श्रोत्यांकडे संक्रमित करण्याच्या किमयेनं गान सरस्वतीची गायकी अलैौलिक बनली. सहस्त्रचंद्र दर्शनाची दीर्घ वाटचाल करणा-या या जीवनानं मानसन्मानाची असंख्य क्षण अनुभवले. रसिकांनी मनःपूर्ण केलेलं प्रेम अनुभवले. त्यांच्या कपाटात पुरस्कारांची गर्दीही आहे. पण या सगळ्यातून दशांगुळे उरणारं गाणं त्यांच्या गळ्यात आहे. 
 
मोगूबाई कुर्डीकरांसारख्या कडक शिस्तीच्या गुरुच्या  पोटी जन्म घेणा-या या  बाईनं गायकीच्या पुरुषार्थाची चौकट स्वकर्तृत्वानं रुंद केली. मनाला येईल तेव्हा मोडलीही. नक्कल करण्याच्या पलिकडचे अद्भुत मापदंड निर्माण करुन ठेवले. शास्त्रीय संगीतातील घराण्याच्या चौकटीबाहेरचा विचार केला. रससिद्धान्ताला जन्म दिला. त्याचं संगोपनही केलं. तसं पाहिलं तर शास्त्रीय संगीताच्या प्रातांत प्रतिभासंपन्न गवय्ये कमी नाहीत. मग किशोरीताईंचं वेगळेपण  आहे तरी कशात? गायकीत असलेला मांगल्याचा ठहराव हीच ती अलौकिक बाब. सुरांच्या मांगल्याचं हे नवं घराणं सुरू करणा-या किशोरीताईंना या प्रवास लाभलेली रवींद्र आमोणकरांची साथ अव्याहत समेवरच राहिली. तू सुरांचा संसार सांभाळ, बाकी सगळं मी बघतो अशा पद्धतीने त्यांनी लावलेल्या अमूल्य साथीचा षड्ज अचल राहिला. 
 
एखाद्या आयुष्यात पारलौकिकतेचं सातत्य तरी किती असावं ? 17-18 व्या वर्षी पौगंडावस्थेच्या अल्याड-पल्याड आवाजाने दगा दिला. दोन एक वर्ष गायकीविना गेली. पण कष्टप्रद साधनेच्या बळावर त्यांनी तो आवाजही परत मिळवला. त्याचंही मिथक झालं. अनेक दंतकथा प्रसवल्या. पण ज्या त्यांच्या सुरासारख्या विशुद्ध नव्हत्या. सुरांच्या साथीनं झालेल्या वाटचालीत संगीताचे अनेक प्रकार या गानसरस्वतीला साद घालत होते. त्यातल्या काही धोपट मार्गांवर चार-सहा पावलं त्यांनीही टाकली. पण वहिवाटीपेक्षा अनवट मार्गाशी सख्य असलेल्या किशोरीताईंनी फर्माईशी गाणं कधी केलं नाही. मी गाईन तेच ऐकावं लागेल, हा त्यांचा हट्ट त्यांच्या गुणवत्तेमुळे श्रोत्यांनी आनंदानं मानला. 
 
गायकीतले त्यांचे प्रयोग स्वान्तःसुखाय नव्हते. त्या प्रयोगातून जन्मलेल्या आविष्कारांनी रसिकांच्या मनावर कायमचं गारुड केलं. अस्सल शास्त्रीय संगीत असूनही "सहेला रे" हातोहात खपलं. माणसाच्या मानसिकतेत भूप काय बदलं करू शकतो याचाच तो प्रत्यय होता. तो भूप काही मिनिटांचा नव्हे, आयुष्याचा होता. भूप म्हटलं की दर्दी माणसाला "सहेला रे" आठवतं. म्हणून तर सौमित्रच्या कविवेतही त्याचं प्रतिबिंब उमटलं. एकीकडे चित्रपट संगीत या प्रतिभेला साद घातल होतं. "गीत गाया पत्थरोंने"च्या पार्श्वसंगीतातील त्यांच्या सहभागामुळे खडकावरला अकुंर म्हणजे काय याची प्रचीती आली. वेगळेपणामुळे "दृष्टी"चं त्यांनी दिलेलं संगीतही गाजलं.
दुसरीकडे वैश्विक आवाका असलेलं किशोरीताईंचं सूर मराठी मनाचा ठाव घेत राहिले. 
 
"जाईन विचारीत रानफुला 
भेटेल तिथे गं सजण मला"
 
यासारखं भावगीत असो की "हे शामसुंदरा" सारखी बंदिश असो, प्रत्यय आला तो अलौलिक प्रतिभेचाच. पण या वाटेवर ही गानसरस्वती रेंगाळली नाही. रमली तर बिल्कुल नाही. ख्याल गायकीच्या शिखरावर मुक्काम ठोकणा-या त्यांच्या प्रतिभेनं भावगीत, चित्रसंगीत, लीलया पेललं. रसिकांचं विश्व अधिक समृद्ध केलं. पण यात त्या रमल्या नाही, त्यालाही कारण होतं. त्यांच्या लेखी सूर म्हणजे देवाला वाहिलेली फुलं. त्यांचं निर्माल्य होऊ द्यायचं नाही, हा त्यांचा अट्टहास. कदाचित म्हणून असेल. रिअॅलिटीवाल्या मंडळींना त्यांच्या दारात जाण्याचंही धाडस होत नाही. 
 
शास्त्रीय संगीताची दीर्घ परंपरा लाभलेल्या आपल्या देशानं एकाच वेळी दोन कलावंत शिखरस्थ झालेलं पाहिले.  भीमसेन जोशी अन् किशोरीताई. दोघांनीही घराण्याचा लौकिक वाढवला. संतवाणी, मीरेची भजनं, भावगीतं असं प्रकार त्यांच्या सुरांनी आणखी मंगल झाले. त्यांच्या पावित्र्यात भर पडली. मराठी मनालाच नव्हे, तर जगभरातल्या श्रोत्यांवर त्या सुरांनी मोहिनी टाकली. तोडीची आर्तता किती उच्च कोटीची असते, हे किशोरीताईंच्या विशुद्ध सुरांनी दाखवून दिलं. 
 
"सहेला रे आ मिल जा...
सप्त सुरन की बेला सुनाए
अब के मिले
बिछुडा न जा..."
 
उत्तररात्रीनंतरच्या रामप्रहरी उमटलेल्या या सुरांमधील आर्तता हे नुसतं गाणं थोडंच आहे? तो तर संवाज आहे, थेट ईश्वराशी साधलेला. तेच तर या गानसरस्वतीचं आयुष्य होतं. लक्ष्मीनं पायीची दासी व्हावं असं...
 

Web Title: Sahela Re ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.